You are currently viewing सारे काही देखाव्यासाठी
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

सारे काही देखाव्यासाठी

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुजाता पुरी, अहमनगर लिखीत अप्रतिम लेख*

*सारे काही देखाव्यासाठी*

*दुश्मनी लाख सही*
*खत्म ना किजिये रिश्ता*
*दिल मिले या न मिले*
*हाथ मिलाते रहिये*

असंच काहीसं आजकालच्या नात्यात आणि मैत्रीत चालू आहे.माणसं एकमेकांशी किती हसून बोलतात, भेटतात.पण हे सगळं खरंच मनापासून असतं का? तर याचं उत्तर आहे फक्त बोटावर मोजण्या इतक्याच माणसांशी आपले असे भेटणे असतं. मग बाकीच्या सगळ्यांबरोबर वर सांगितलेली औपचारिकता आपण पूर्ण करत असतो.पूर्वी प्रवासाची साधने नव्हती आणि आत्ता सारखी त्वरित संदेश वहन करणारी भ्रमणध्वनी नावाची झंझट तर अजिबात नव्हती. तरी माणसात माणूस टिकून होता. संबंधात गोडवा होता,आपुलकी होती.आता जास्त आपुलकी दाखवली कि भीती वाटते कि हा माणूस आपल्याला काही मागणार तर नाही ना.
म्हणजे तशी परिस्थितीच आहे हो.लोक फक्त त्यांचं काम असतील तर आणि तरच गोड बोलतात.नाहीतर पाठ वळली कि तुमच्या नावाने घुगऱ्या वाटायला सुरुवात होते.प्रत्येक माणूस गर्दीत ही आपलं बेट होऊन जगतोय.शेजारच्या माणसाच्या मनात आत्महत्येचा विचार आला तरी याला थांग पत्ता लागत नाही.तो गेल्यावर मग हळहळ करायला सुरुवात होते.जर,तर अशी आभासी वाक्ये बोलायला सुरुवात होते.त्याने जर मला सांगितलं असतं तर अस झालं नसतं वगैरे. मुळातच तो जीवंत असताना तू त्याला ही आपुलकी दाखवली होती का? या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणूनच येणार. मग तो गेल्यावर काय उपयोग आहे अशा वांझोट्या काळजीचा.माणसं जिवंत असतात तो पर्यंत त्यांचं महत्त्व समजून घ्यायचं नाही आणि मग ते गेले की नैवद्याला त्यांच्या आवडीचे पदार्थ करायचे.किती नौटंकी पणा ना ?
माणसं आपल्या पाठीमागे काय बोलतात हे जर कळलं तर त्यांचं आपल्या समोर आपल्याशी हसून बोलणे किती नाटकी आहे याची चीड येते.

*नफरतो के शहर मे*
*चालायो के डेरे है*
*यहा वो लोग रहते है*
*जो तेरे मुह पे तेरे है*
*और मेरे मुह पर मेरे है*
माणसा माणसातील हे विखारीपण वरतून प्रेमाचा मुलामा दिलेलं जग किती बेगडी आहे याचा विचार केला कि मन सुन्न होतं. खरं तर या जगात निर्मळ भावना, प्रेम ,आपुलकी यांना काहीच महत्व नाही का ? असं वाटायला लागत.असे असले तरी या अंधाऱ्या वाटेवर हातात आपुलकीचा मिणमिणता दिवा घेऊन चालणारे ही असतात बरं. म्हणूनच तर हे जग चालू आहे ते काहींच्या चांगुलपणावर. समोरचा माणूस खोटं बोलतोय हे ठाऊक असताना ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यासारखं दाखवायचं आणि त्याचं बोलण ही ऐकायचं हे मोठं कठीण काम आहे.माणसाला विसराळूपणाचे वरदान मिळाले नसते तर माणूस अशा कटू आठवणी आठवून जगूच शकला नसता.
आपण कोणत्या धर्माचे आहोत हे सिद्ध करण्यासाठी माणूस जितका आटापिटा करतो तितकाच आटापिटा तो अगोदर माणूस आहे हे सिद्ध करण्यासाठी केला तर मनामनातील द्वेष, किलमिष दूर होतील.

*तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात*
*जी पाठ फिरवल्यानंतर ही तुमच्याशी प्रामाणिक असतात आणि मनापासून तुमची असतात.*

माणसं एकमेकांविषयी मनात काय विचार करतात हे कळणारं जर एखादं यंत्र असतं ना तर माणूस वेडा झाला असता.आपल्याबद्दल समोरच्याच्या मनात हे असे विचार आहेत आणि आपण तर याला काय समजत होतो अशी त्याची अवस्था होईल.म्हणूनच राग आला तर स्पष्ट बोलावं,खुशाल भांडावं.
विचारभेद असतातच,ते ही स्वीकारता येणं महत्वाचं.
चांगल्याला चांगलं म्हणता येणं हा तर आपल्या मनाचा मोठेपणा असतो,पण तो समजण्या इतपत मोठेपण आपल्याकडे नसते.टीका करायला तयार आणि कौतुक करायला मात्र मागे राहणार. अशा विचारांनी आपण किती छोटे आहोत हेच आपण समोरच्याला दाखवून देत असतो. वास्तविक पाहता पाण्याच्या चवीनुसार त्याचं महत्व आणि शब्दाच्या निवडीवरून वाणीचं महत्व ठरत असतं. एखाद्या विषयी पाठीमागे बोलताना ही विनाकारण निंदा करून बोलू नये.या जागी आपण आहोत आणि आपल्या विषयी मागे अस बोललं तर आपल्याला कसं वाटेल ? याचा विचार जरूर करावा.आपले बोलणे ऐकल्यावर आपल्याविषयी गर्व वाटेल असंच बोलणं असावं.आपली पात्रता सिद्ध करायची ही एक कसोटी आहे असच समजा हवं तर..

*बडी अजीब रोशनी है, तेरे शहर की*
*उजालो के बावजुद चेहरे पहचानना मुश्किल है*

अशी अवस्था आजकाल झालेली आहे.समोर असलेला माणूस नक्की आपला हितचिंतक आहे कि आपले झालेले हित पाहून चिंता करणारा आहे.हे कळायलाच मार्ग नाही. सर्वत्र फक्त देखावा दृष्टीस पडत आहे.

*सुजाता नवनाथ पुरी*
अहमदनगर
8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =