You are currently viewing ना.दीपक केसरकर यांची जनसंवाद यात्रा निघाली सावंतवाडी मतदार संघात

ना.दीपक केसरकर यांची जनसंवाद यात्रा निघाली सावंतवाडी मतदार संघात

*गावोगावी उत्स्फूर्त स्वागत, अलिशान व्हॅनिटी व्हॅन आबालवृद्धांचे आकर्षण*

 

सावंतवाडी :

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना.दीपक केसरकर यांनी “व्हील्स विल्ला” ही आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली व्हॅनीटी व्हॅन मधून सावंतवाडी मतदारसंघातील गावागावातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात केली आहे. यात त्यांनी मळेवाड, मळगाव, केसरी, सांगेली, माजगाव आदी गावांमधून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी व्हॅनिटी व्हॅनला पाहण्यासाठी, आकर्षक गाडीसोबत आपले छायाचित्र काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या नावीन्यपूर्ण गाडीला अधिक प्रसिध्दी मिळाली.

उबाठाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या टीकेमुळे, अशा अत्याधुनिक गाडीतून केसरकर हे गावोगावी फिरून भाजपचे उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करणार असल्याने व्हील्स विल्ला आणि ना.केसरकर हे मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ना.केसरकरांनी डॉ.निलेश राणे यांच्या प्रचारात सर्वप्रथम ही गाडी वापरली होती. त्यावेळी निलेश राणे यांचा विजय झाला होता आणि आता नारायण राणेंच्या प्रचारात पुन्हा नाम.केसरकर तशाच व्हॅन मधून प्रचारात उतरले असल्याने नारायण राणेंचा विजय दूर नसल्याचे बोलले जात आहे.

ना.केसरकरांसह इतर नेते लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी उतरले आहेत परंतु आधी जाहीर केल्याप्रमाणे व्हॅनिटी व्हॅन मधून प्रचारास उतरलेले दीपक केसरकर हे गावागावात आकर्षण ठरत आहेत. एकेकाळी नारायण राणेंचे कट्टर विरोधक या भूमिकेतून महायुतीच्या मित्रपक्षांचे उमेदवार असल्याने राणेंचे समर्थक अशा भूमिकेत ना.केसरकर आता मतदारसंघात पहायला मिळत आहेत. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. प्रत्येक नेता, लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाची ध्येयधोरणे राबविण्यासाठी झटत असतो. नारायण राणे हे शिवसेनेचं मित्रपक्ष असलेल्या भाजपाचे उमेदवार असल्याने नाम.केसरकर वैयक्तिक वैर विसरून राणेंच्या प्रचारात सक्रिय झाल्याने सावंतवाडी मतदारसंघातील केसरकरांच्या प्रभावाचा फायदा नक्कीच राणेंना होणार आणि केसरकर आपल्या मतदारसंघातून राणेंना आघाडी मिळवून देणार यात शंकाच नाही.

निवडणुकीचा प्रचार जोर धरत असताना आबालवृद्ध मात्र अत्याधुनिक गाडी आतून कशी आहे हे पाहण्यासाठी गर्दी होताना दिसून आली तर ज्यांना गाडी आतून पाहता आली ते पाहण्यात दंग झाल्याचे दिसले. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आठ माणसे बसण्याची सुविधा आहे, तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स घेता येईल अशी देखील सोय आहे. एवढेच नव्हे तर गावोगावी फिरताना उशीर झाल्यास सदर गाडीत विश्रांती, मुक्काम सुद्धा करता येतो. त्यामुळे व्हॅनिटी व्हॅन हे आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा