You are currently viewing तू हवासच
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

तू हवासच

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखीत अप्रतिम ललित लेख*

*तू हवासच*

ओम सूर्याय नमः
ओम खगाय नमः

हा धीरगंभीर आवाज…हा मंत्रघोष…कोण बरं अर्घ्य देतंय…तेही आत्ता…अशा उतरत्या संध्याकाळी…मावळतीच्या सूर्याला…? पण कोणीच दिसत नाहीय आसपास…
कदाचित त्या खडकाच्या पलीकडे असावं कोणीतरी…

बा भास्करा…उगवत्याला नमस्कार करणाऱ्या या दुनियेत आहेत हं असेही काही महाभाग…उपकाराची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करणारे…पण तुला त्याने काय फरक पडतो म्हणा…तू तर एखाद्या स्थितप्रज्ञासारखे स्वतःचं नित्य कर्तव्य करत रहातोस…

सकाळ झाली की उगवणं आणि संध्याकाळ झाली की मावळणं…मग ते कधी डोंगरावरून प्रकट होणं असो किंवा सागरकाठापल्याडच्या क्षितिजावरून गडप होणं असो, कधी एखाद्या उंच इमारतीमागून उदय तर कधी एखाद्या दाट झाडीमागे अस्त…पण दोन्ही वेळी एक गोष्ट मात्र समान असते तुझी…तू येतांना जसा केशर सडा शिंपीत येतोस तसाच जातांनाही रंगपंचमी खेळत जातोस…पण या समानतेतही जरासा विरोधाभास जाणवतोच मनाला…त्या पंच पंच उष:काली नभांगणातील केशरी पिवळ्या सड्यावर रांगोळी रेखलेली असते सोनेरी वर्खाची…आणि खाली त्या विशाल जलधीवर पडलेले त्याचे प्रतिबिंब…तो अवर्णनीय नजारा…कसा करावा शब्दांकित…अवघ्या चराचरावर पसरलेली चैतन्यमयी लहर…सागरलाटांवरही असतो मुलामा चढलेला चंदेरी सोनेरी…शरीरातला अणू रेणू ही जणू नाचत असतो उत्साहानं…ऊर्जेनं…

प्रकाशाचा दूत आला
घेऊन ऊर्जेचा पेटारा
उत्साह, उमंग, चैतन्याने
भरून गेला मनगाभारा

खरं म्हणजे संध्याकाळीही असतात तेच रंग…तेच आकाश…तोच समुद्र…पण लवकरच त्याला कवेत घेते काजळमाया…किनाऱ्यावरील काळ्याभोर खडकांशी तादात्म्य पावतात काळ्यासावळ्या लाटा…आणि गूढ गंभीर गाज ऐकतांना मनसागरातही उठतात अस्वस्थपणाच्या लहरी…व्यापून रहाते एक अनामिक हुरहुर…जीव कातर कातर होतो…

का बरं व्हावं असं…रोजचाच तर दिनक्रम असतो तो तुझा…कळत असतं

*रात्रीच्या गर्भात असे*
*उद्याचा उष:काल*

कदाचित या संध्याछाया मानवी आयुष्याशी निगडित असतील म्हणून…फक्त संध्याछायाच का…जन्मवेळ म्हणजे उगवतीच नव्हे का आयुष्याची…आणि हळूहळू कोवळ्या सकाळनंतर माध्यान्ही मार्तंडासम स्व-कर्तृत्वाने तळपून कातर संध्याकाळकडे उतरत जाणारा तू म्हणजे संपूर्ण मानवी आयुष्याचं प्रतीकच नव्हे का दिनमणी…

पण ह्या उतरत्या संध्याछाया हळूहळू संपूर्णपणे अस्ताकडे झुकत असतांनाही त्याची मुळीच खंत न करता तू उदयाच्या वेळी करतोस तशीच रंगांची बरसात करत असतोस…प्रसन्न सोहळाच जणू निर्गमनाचा…आम्हाला सुचवत तर नाहीस,

*कशास भय हवे जातांना*
*का होता उदास*
*आलेला जाणार एक दिन*
*सत्य असे हे खास*

*करा सोहळा स्मरून मजला*
*जरी रोजच येणे जाणे*
*जन्मासम मृत्यू महोत्सव*
*हे तर उदयास्त होणे*

खरं म्हणजे तू उगवतोस म्हणून सकाळ होते आणि तू मावळतोस म्हणून संध्याकाळ…खरं ना दिनकरा! तू म्हणजे अवघ्या सृष्टीचा जीवनदाता…
तू एवढा सर्व शक्तिमान…पण तुलाही ग्रहण लागतंच…आयुष्यात येणाऱ्या संकटांप्रमाणे…कधी किंचित, कधी संपूर्ण…ते कधीतरी सुटणार आहे, किंबहुना कधी सुटणार आहे हे माहीत असतांनाही तेवढा अल्पकाळतरी फक्त अशुभाचंच ग्रहण आमच्या मन-सूर्यालाही लागत असतंच…मग नेहमीसाठीच…

*तुजविन जीवन*
*घोर अंध:कार*
*होईल किती दैना*
*उडेल हाहा:कार*

तेव्हा आदित्या…तू कोपाविष्ट होऊन आम्हाला भाजून काढलंस तरी आणि मेघांमागे लपून, जलधारांच्या पडद्याआड राहून दिवसेंदिवस दर्शन न दिलंस तरीही…तू हवास, सहस्त्ररश्मी तू हवासच…

भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =