You are currently viewing आठवणीतील श्रीकांतदादा..
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

आठवणीतील श्रीकांतदादा..

*लालित्य नक्षत्रवेल….शब्दांकुर समूहाचे सर्वेसर्वा स्व.श्रीकांत दीक्षित यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ भावपूर्ण आदरांजली*

*आठवणीतील श्रीकांतदादा…*

भेट जरी ना जाहली कधी
स्मरणात नित्य राहती बोल…
अर्ध्यावरची ती साथ आपुली
देऊन गेली हृदयी जखम खोल…

निरागस असते मैत्री, जी केवळ शब्दांनी जोडली जाते… साथ, सोबत, स्पर्श, नसते कशाचीही गरज तिला… चार शब्द मायेचे…हृदयातून हृदयाशी बोललेले प्रेमाचे… जपून ठेवतात ओलावा हृदयात अगदी खोलवर… नसते कसली अपेक्षा…ना असतो कुठला स्वार्थ…हसत हसत जीवन जगताना केवळ करत असतो तो परमार्थ…! चार क्षणांचे जीवन आपले…आनंद मनी भरून गेले…मैत्रीचे सुगंधी क्षण… ओंजळीतही उरून गेले…!
नाजूक, कोमल, सुंदर फुलपाखराने यावे…या फुलावरून त्या फुलांवर बसावे…मधुरस प्राशन करावे अन् आनंद वाटत फिरावे…वाऱ्याच्या झुळुकेसोबत दूर कुठेतरी उडावे…निसर्गात लुप्त व्हावे…! अगदी तसंच झालं होतं जीवन…फुलपाखराच्या नाजूक, कोमल पंखांवरील मनमोहक रंगांनी मनाला मोहून टाकले होते…भिरभिर उडणाऱ्या पंखांवरील नक्षी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती…परंतु मनाला आनंद देणारे फुलपाखरू लुप्त झाल्यावर जसं मन सैरभैर होतं… अचानक हे असं कसं झालं? या प्रश्नाने वेडावतो अगदी तसंच काहीसं झालं तुमच्या अनपेक्षित जाण्याने…! *श्रीकांत दीक्षित* एक हरहुन्नरी, अष्टपैलू, सर्वाभिमुख, सालस, मायाळू, व्यक्तिमत्त्व… अगदी बोट धरून साहित्यिक मार्गावर चालायला शिकवणारे उत्तम गुरुच…! लेख खूप लिहिलेत, परंतु त्यातील बारकावे, खुबी, शब्दफेक, लालित्य अशी जी नक्षत्र असतात त्यांची वेल करून लेखातील सर्वांगसुंदर शब्दांना लालित्य लेऊन शब्दांची नक्षत्रवेल उंच उंच वाढविणारे, जतन, जपणूक करून प्रोत्साहन, उमेद, आशावाद निर्माण करून लिखाणाची उर्मी बोटांमध्ये भरणारे जर कोण असतील तर ते श्रीकांतदादा…!
ज्या व्यक्तीच्या केवळ साथ, सोबत, संगतीने वाचणारेही लिहिते होतात त्यांची प्रतिभा काय असेल हे तर सांगायलाच नको…! दादांनी अनेक वाचक असलेल्या मित्रपरिवार, ओळखीच्या लोकांना वाचता वाचता लिहिण्याची आवड निर्माण केली, प्रेरणा दिली… “अरे, हे तर मी लिहू शकतो”…असा आत्मविश्वास निर्माण केला… त्यामुळे अनेकजण आज स्वतःमध्ये लेखक, कवी, एक साहित्यिक शोधू लागले आहेत. लहान असो वा मोठं…त्याच्याशी आदरानेच बोलणे हा दादांचा सर्वात मोठा गुण होता…प्रत्येक व्यक्ती त्याच्या जागी मोठी असते, मग आपण त्यांचं मोठेपण जपलं पाहिजे याच वृत्तीने त्यांनी माणसांना आपलेसे केले…जोडले. माणसं जोडण्याचं त्यांना जणू व्यसनच होतं… कदाचित आपलं आयुष्य कमी आहे, त्यात आपण माणसं जोडून प्रेम, माया, आपुलकीची बाग फुलवत जावं असंच त्यांना वाटलं असेल म्हणून तर आज नक्षत्रवेल… शब्दांकुर अशा शब्दांचे नक्षत्र त्यांनी आपल्या सर्वांसाठी कायमचेच रिते करून ठेवले आहे…त्यात शब्दांची पेरणी करून लालित्याचा काव्याचा अंकुर रुजविणे हे आपल्या सारख्या लेखणीला धार लावणाऱ्या सर्वांचंच कर्तव्य…!
लिखाण कोणी केलंय… ती व्यक्ती नवोदित आहे की जाणकार…. हे कधीही न पाहता आवडणाऱ्या लिखाणाला अफलातून दाद देण्याची शिकवण दादांकडूनच घ्यावी…कुठे चुकतंय… आणखी काय पाहिजे याची माहिती देत…लिहीणाऱ्याला आणखी उत्तम लेखनासाठी प्रेरणादायी असायच्या त्या त्यांच्या प्रतिक्रिया…! त्यांच्या प्रोत्साहनामुळे कितीतरी जणांना आज साहित्याची गोडी लागली… चंदनाच्या केवळ सोबतीने चंदनाचा गंध आपल्या सर्वांगाला यावा अगदी तसाच श्रीकांतदादांच्या संगतीने अनेकांचे लेखक, कवी, साहित्यिक झालेत…! *शब्दगंध*…या प्रातिनिधिक कथासंग्रहाच्या निर्मितीच्यावेळी स्वतःच्या वैयक्तिक प्रकाशनासाठी देखील कोणी धडपडणार नाहीत एवढी त्यांची धडपड असायची…जबाबदारी म्हणजे काय आणि कशी पेलावी? हे त्यांच्याकडूनच शिकले पाहिजे. शब्दगंध कथासंग्रहात ज्यांच्या कथा होते ते निर्धास्त असायचे, पण दादा मात्र कथा एकत्र करण्यापासून छपाई, पॅकिंग, पोस्टेज आणि प्रत्येकाच्या घरी पोचण्यापर्यंत जबाबदारी खांद्यावर घेऊन चालले होते. एवढंच नाही तर कथासंग्रहाचे प्रकाशन पद्मश्री श्री.गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करून शब्दगंधला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. इच्छा असूनही तेव्हा उपस्थित राहता आलं नव्हतं.
श्रीकांतदादांचं ललीतलेखन तर वाचतंच रहावं असं असायचं…शब्दांचा खजिना रिता करावा तसे एकापेक्षा एक शब्द त्यांच्या ललित मधून लेखनात येत होते…अक्षरशः फुलांच्या पुंकेसरातून मधुर रस पाझरावा अशी अवीट गोडी त्यांच्या शब्दांमध्ये असायची…त्यामुळे माझ्यासहित प्रत्येकजण त्यांच्या ललितचा चाहता होता आणि आजही आहे. स्वतः कितीही सुरेख लिहिलं तरी नवोदितांच्या पाठीवर कौतुकाची थाप असायची…प्रोत्साहनाची खैरात, सोज्वळ मृदुभाषेतून व्हायची…अनेकांशी बंधू म्हणून रेशमी नाते जपलेले श्रीदादा म्हणजे संवेदनशील मनाचे आदर्श व्यक्तिमत्त्व…!
आज श्रीकांतदादा आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी पेरलेले शब्द पुन्हा पुन्हा सर्वांच्या लेखणीतून रुजत जातील…आणि शब्दांना अंकुर फुटून शब्दांच्या नक्षत्रांची वेल दादांच्या आठवणींच्या ओलाव्याने जोमाने बहरून, मोहरून येईल…दृश्य नसलं तरी अदृश्य फुलपाखरू पुन्हा प्रत्येकाच्या मनामध्ये बसून लिखाणाचा मधुरस शब्दशब्दांतून पाझरेल तीच खरी श्रीदादासाठी श्रद्धांजली ठरेल…
अत्यंत मितभाषी, मृदू स्वभाव, शांत, सोज्वळ, निर्मळ मनाचे आपले श्रीकांतदादा दीक्षित यांना साश्रूनयनांनी भावपूर्ण आदरांजली….🌹🌹

【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + six =