You are currently viewing वैद्यकीय बिल मंजुरीसाठी लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील अधीक्षकावर गुन्हा

वैद्यकीय बिल मंजुरीसाठी लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील अधीक्षकावर गुन्हा

१० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीची कारवाई; सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सिंधुदुर्गनगरी :

वैद्यकीय बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६, रा. स्वामी महादेव अपार्टमेंट, तेलीआळी-कणकवली) यांच्याविरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ मे रोजी ही कारवाई केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ४१ वर्षीय तक्रारदाराने वैद्यकीय उपचारांच्या बिलाची फाईल मंजुरीसाठी सादर केली होती. मात्र, बिलात त्रुटी असल्याचे सांगत कार्यालयीन अधीक्षक तेली यांनी काम पूर्ण करून देण्यासाठी बिलाच्या एकूण रकमेच्या ३ टक्के म्हणजेच १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम १० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

तक्रारदाराने याबाबत कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ४ मे २०२६ रोजी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकांच्या कक्षात एसीबीने सापळा रचला. ठरलेली १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महादेव तेली यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलिस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सिंधुदुर्ग युनिटचे पोलिस उपअधीक्षक विजय पांचाळ, पोलिस निरीक्षक दिपक माळी व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा