You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पा’चे १७ मे रोजी भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पा’चे १७ मे रोजी भूमिपूजन

ओरोस येथे होणार भव्य सोहळा; पत्रकार स्नेहसंमेलन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ‘विविध गुणदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पा’चे भव्य भूमिपूजन येत्या १७ मे रोजी दुपारी ४ वाजता ओरोस येथे होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.

या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर ओरोस येथे पत्रकारांचे जिल्हास्तरीय स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पत्रकारांच्या कौटुंबिक यशाचाही गौरव करण्यात येणार आहे. दहावी व बारावी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ज्या पत्रकारांची मुले उत्तीर्ण झाली आहेत, त्यांनी आपली नावे तातडीने जिल्हा संघाकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘विविध गुणदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकारांसह त्यांच्या पत्नी आणि मुलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. कला सादरीकरणासाठी इच्छुकांनी आपली नावे आगाऊ कळवावीत, असेही आयोजकांनी सांगितले आहे.

या कार्यक्रमासाठी सावंतवाडी परिसरातील पत्रकारांच्या येण्या-जाण्यासाठी विशेष सोय करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा