You are currently viewing अस्तित्वाचं काय?

अस्तित्वाचं काय?

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*अस्तित्वाचं काय?*

मनातलं ऊन एकदा
म्हणे सावली हवी मला
दाह शमवण्या अंगाचा
चांदण्यांचा हात धरायला

अरे! वेडा की खुळा तू
तुला कळतं का काही?
तुझ्याबरोबर सावली
कधीच नांदणार नाही

आगीपासून जसा बर्फ
प्रकाशापासून अंध:कार
तुझ्यापासून सावलीही
तशीच दूर दूर जाणार

अविचारी विकारांनी
मी खूप तप्त झालोय
अहंकार, राग, द्वेषांनी
कित्ती पोळून निघालोय

दया, क्षमा, शांतीची
हवीय छाया थंडगार
प्रेमाची, मानवतेची
उटी चंदनी बहारदार

अरे देवा! कसं आणू
गुलाबकावलीचं फुल
उन्हाला का पडावी
शीतल चांदण्यांची भूल

प्रतीक्षा कर, पसरेलच
कोजागिरीची चांदण-साय
पण…सूर्य मावळल्यावर
तुझ्या अस्तित्वाचं काय?

भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334
९-१०-२२

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 1 =