You are currently viewing मिसाईल मॅन भारतरत्न, ए.पी.जे. कलाम

मिसाईल मॅन भारतरत्न, ए.पी.जे. कलाम

आज पंधरा ऑक्टोबर. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस. आज प्रेरणादिन… आज आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन..आणि आज देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती, जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ मिसाईल मॅन भारतरत्न आदरणीय स्व.ए.पी जे.कलाम सरांचा जन्मदिवस. हो ते अवघ्या भारतवर्षाचे सर होते, शिक्षक होते. त्यांनीच आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवली. त्यांनीच आमचा देशाबद्दलचा अभिमान आणि स्वाभिमान शिकवला आणि त्यानीच आम्हाला भविष्यातील सामर्थ्यशाली भारतवर्षाच स्वप्न दाखवलं.
ते नेहमीच म्हणायचे, “l also love to dream”.. You have to dream before your dreams can come true” हे त्यांच्या जगण्याचं ब्रिदवाक्य होतं. या देशातील शिक्षक आणि विद्यार्थी हिच आत्मनिर्भर भारताची खरी संपत्ती आहे. हे ते वारंवार सांगत.
ते राष्ट्रपती असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांना एका विद्यार्थ्यांने प्रश्न विचारला, “सर, आपला पुनर्जन्मावर विश्वास आहे का? आणि जर तो आपणास मिळाला तर तुम्हाला कोण व्हायला आवडेल? या प्रश्नाच अगदी हसत हसत उत्तर त्यांनी दिल होत..सर म्हणाले, होय माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे..आणि तो मला मिळाला तर मी उत्तम शिक्षक होईन..
देशप्रेम आणि देशभक्ती याचं उत्तम रसायन म्हणजे कलाम सर. देशाच्या संरक्षण सिध्दता भक्कम करायची असेल तर संशोधन आणि तंत्रज्ञान यावर जोर दिला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. आपल्या सुदैवाने आणि ईश्वरी शक्ती म्हणा सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न पहाणारे आणि त्याचा पाठलाग करणारे दोन सच्चे राष्ट्रभक्त एकाच वेळी देशाच्या सर्वोच्च पदांवर विराजमान झाले. भारतरत्न स्व.अटलजी पंतप्रधान आणि दुसरे भारतरत्न मिसाईल मॅन कलामजी राष्ट्रपती हा देशाच्या द्रुष्टीने सुवर्णकाळ होता…म्हणूनच तर जगावर राज्य गाजवण्याची राक्षसी विस्तारवादी आकांक्षा बाळगणाऱ्या कोणत्याही देशाना भिक न घालता याच राष्ट्रभक्तानी अणूचाचणी करुन अवघ्या विश्वाला एक दणदणीत मेसेज दिला “हम भी कुछ कम नही”! आणि हे शक्य झाल ते अटलजींची राजकीय इच्छाशक्ती आणि कलाम सरांची कर्तव्यनिष्ठा.
विज्ञान आणि तंत्रज्ञानात २०२०पर्यंत भारत देश “सुपरपाॅवर” झाला पाहिजे हे त्यांच स्वप्न होत. त्या अनुषंगाने त्यांनी जी काही पेरणी करून ठेवली होती त्याचे काही प्रमाणात सकारात्मक परिणाम आपल्याला आज पहायला मिळत आहेत..
सतत नवनवीन कल्पना आणि त्याचा पाठपुरावा करणारी माणसं त्यांना खूप आवडत. नवयुवक हे आपल्या देशाचे आशास्थान आहे. त्यांच्या नवीन कल्पनांना आपण बळ दिल पाहिजे यासाठी ते तासनतास विद्यार्थ्यांशी हितगुज साधत.
अखेर त्यांना मरणही अगदी त्यांच्या इच्छेनुसारच आलं. २७ जुलै २०१५ रोजी अशाच एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत असतानाच ते कोसळले.
त्यांचे राष्ट्रपती पदासाठी नावं जाहीर झाल्यावर या देशातील डावे, उजवे, धर्मनिरपेक्ष अशा सगळ्या राजकीय पक्षानी एकमताने संमती दिली यावरूनच त्यांच्या अफाट कर्तृत्वाची आणि बुध्दीमत्तेची आणि प्रखर राष्ट्रभक्तीची साक्ष मिळते. ते राष्ट्रपती झाल्यावर एका जाहीर कार्यक्रमात भूतपूर्व राष्ट्रपती स्व.प्रणवदा म्हणाले होते, Kalam sir is President of Public .. हो ते लोकांचे, सामान्य जनतेचेच आणि या भारतमातेचे राष्ट्रपती होते.
देशाच्या या खऱ्या धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रभक्त सुपूत्राना त्यांच्या जन्मदिनी त्रिवार सलाम…

ॲड. नकुल पार्सेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =