You are currently viewing जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेंगुर्ल्यात ‘महा-स्वच्छता मोहीम’ आणि ई-कचरा संकलन अभियान

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेंगुर्ल्यात ‘महा-स्वच्छता मोहीम’ आणि ई-कचरा संकलन अभियान

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेंगुर्ल्यात ‘महा-स्वच्छता मोहीम’ आणि ई-कचरा संकलन अभियान

झुलता पूल ते नवाबाग बीच परिसरात ५ जून रोजी स्वच्छता उपक्रम; नागरिकांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन

वेंगुर्ले :

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवार, दि. ५ जून रोजी सकाळी ७ वाजता नवाबाग बीच येथे झुलता पूल परिसरापासून भव्य ‘महा-स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाचा संदेश समाजात प्रभावीपणे रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वेंगुर्ला शहरातील झुलता पूल ते नवाबाग बीच हा परिसर निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारा आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, वाढत्या पर्यटनामुळे प्लास्टिक व इतर कचऱ्याचा साठा वाढत असून त्यामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात येत आहे. तसेच सागरी पर्यावरण आणि जैवविविधतेवरही त्याचे विपरीत परिणाम होत आहेत.

या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, युवक मंडळे, विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

यासोबतच पर्यावरण व मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या ई-कचऱ्याच्या सुरक्षित आणि शास्त्रीय व्यवस्थापनासाठी विशेष ‘ई-कचरा संकलन अभियान’ देखील राबविण्यात येणार आहे. घरगुती वापरातील जुने किंवा नादुरुस्त मोबाईल, चार्जर, इयरफोन, संगणक, लॅपटॉप, कीबोर्ड, केबल्स, टीव्ही, रिमोट, मिक्सर, इस्त्री, घड्याळे, बल्ब, ट्युबलाईट तसेच इतर निकामी इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू ई-कचऱ्यामध्ये जमा करता येणार आहेत.

नागरिकांनी असा ई-कचरा सामान्य कचऱ्यात न टाकता ५ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शहरात फिरणाऱ्या विशेष संकलन वाहनाकडे सुपूर्द करावा किंवा नगरपरिषदेच्या इमारतीखाली कार्यरत ‘आर.आर.आर. केंद्रा’त जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेंगुर्ला शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असून नागरिकांनी या दोन्ही मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण संरक्षणाच्या राष्ट्रीय अभियानात आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप आणि मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा