You are currently viewing वारस

वारस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.आसावरी इंगळे, (जामनगर) लिखित अप्रतिम कथा*

*‘वारस’ (भाग १)* –

“न… नाही…नाही… सोड मला…” शालू जीव मुठीत घेऊन किंचाळत होती, धडपडत होती परंतु राघोची पकडही पक्की होती. ती जितकी सुटकेचा प्रयत्न करत होती, राघोची बोटं तिच्या दंडावर आवळली जात होती. तिचं ओरडणं ऐकून तिसऱ्या मजल्यावरून चार वर्षाची जुई धावत आली आणि तिच्या मागोमाग तिची आई, कामिनी! शालूला असहाय्य अवस्थेत पाहून तिने तिच्याकडे धाव घेतली.

“सोल..सोल.. छोत्या आईला..” ती नाजूक हाताने राघोला मारू लागली. अचानक राघोचा शालूच्या दंडावरील पकड ढिली झाली. त्याने जुईला जोरात चिमटा घेतला.

“आई…”, जुई कळवळून रडू लागली.

“सोड..सोड तिला.. जुई…”, शालू जुईकडे झेपावली तशी राघोने जुईला दोन्ही हाताने उचलले.

“हं..तर डॉक्टरकडे न येण्याचं कारण हे आहे! मला कुणकुण लागली होतीच. म्हटलं तुला अचानक शिंग उगारायला झालं तरी काय!”, तो कुत्सित हसला.

“जुई सहीसलामत हवी असेल तर दुपारी गर्भजल परीक्षणासाठी तयार रहा…आणि हो! जास्त हुशारी मारू नकोस.. माझ्या परवानगीशिवाय पान हलत नाही गावातलं.. इथून तिथपर्यंत सर्व माझ्या मुठीत आहेत.” डोळे गरगर फिरवत राघो बोलला. “तयार ठेव हिला..” जाता जाता त्याने कामिनीला दरडावले. कामिनीने मुकाट होकार दिला. राघो गेला तसा शालू जुईजवळ धावत आली. जुई अजूनही मुसमुसत आईला बिलगून होती. राघोने चिमटा घेतलेला भाग रक्ताळल्यासारखा झाला होता. शालूने त्यावर मलम चोळलं. कितीतरी वेळ तसाच निघून गेला.

“तू पड आता …. दुपारी जायचं आहे डॉक्टरकडे..”, शालूकडे न पाहताच कामिनी झोपलेल्या जुईला घेऊन वर गेली.

शालू पलंगावर आडवी झाली खरी पण विचारांचे थैमान तिला झोपू देईना. कुठून लग्न केलं राघोशी? कामिनीशी स्पर्धा करता करता आपणही तोंडघशी पडलो! किती समजावलं होतं घरच्यांनी.. मनात राग असूनही कामिनीनेदेखील फोन केला होता.. कामिनी..किती वैर होतं तिच्याबद्दल कॉलेजमध्ये असताना पण आता..तिच्याशिवाय कोणी कोणी नाही या जगात.. तिचे मन आक्रंदू लागले.. त्याच वेळेस कामिनीचे ऐकले असते तर… पण त्यावेळेस तर असूयेचे भूत चढले होते नं अंगात…

शालू, कामिनी आणि राघो तिघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. राघो एका गावाच्या जमीनदाराचा मुलगा होता. राजकारण आणि अरेरावी त्याच्या रक्तातच होती. अभ्यासातही तो बरा होता शिवाय दिसायला राजबिंडा व भरपूर पैसेवाला असल्याने त्याच्यामागे लागणाऱ्या मुलींची संख्या भरपूर होती. शालू व कामिनी या रुपगर्वितादेखील त्याला अपवाद नव्हत्या. दोघीही दिसायला सुंदरच..शालू कामिनीपेक्षा कांकणभर जास्त सुरेख होती तरीही राघोच्या प्रेमाखातर ‘कॉलेज क़्विन’ ही पदवी कामिनीच्या पदरात पडली होती. तेव्हापासून शालू कामिनीबद्दल मनात राग धरून होती. तिचे आणि राघोचे जमू नये यासाठी तिने बरेच प्रयत्न केले. अगदी राघोजवळ प्रेमाची कबुलीही दिली तरीही कॉलेज संपता संपता राघोने लग्न केले ते कामिनीशीच. शालू खूप चरफडली..चिडली पण त्याचा काही फायदा होणार नव्हता. कामिनीने राघोला धोका दिला, मग राघोने आपल्याजवळ प्रेमाची भीक मागितली पण आपण त्याला धुत्कारले, तो रडला वगैरे चित्रपटात शोभतील असे दृश्य ती उघड्या डोळ्याने पाहू लागली. परंतु दोघांचे लग्न होऊन आता ५-६ वर्ष होत आले होते. शालूला अपेक्षित असे काहीच झाले नव्हते. तरीही तिने अद्याप लग्न केले नव्हते. काही ना काही कारणाने ती आलेल्या स्थळांना नकार देत होती. आईवडिलांच्या कुठल्याही भावनिक आव्हानाला ती बळी पडत नव्हती. राघोला ती विसरली नव्हती आणि कामिनीचा विजय तिच्या हृदयात हलकी कळ उमटवून जात असे. त्यांचे जीवन सुखी असू नये, अशी ती मनोमन प्रार्थनाही करीत असे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उर्मी मात्र ती महत्प्रयासाने दाबून ठेवली होती. अशातच एक दिवस तिला राघोचा फोन आला. त्याने तिला भेटायची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या आवाजातील हताशपणा शालूला जाणवल्याशिवाय राहिला नाही. कामिनी त्याच्यासोबत आली नव्हती.. तिच्याबद्दल फोनवर काही सांगण्यास त्याने नकार दिला होता.. म्हणजे अर्थ स्पष्ट होता, दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. मनात उडणारे आनंदाचे कारंजे सांभाळत ती त्वरितच राघोला भेटायला गेली.

*(क्रमशः)*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =