You are currently viewing शाळा

शाळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी प्रोफेसर डॉ. जी. आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम ग्रामीण विनोदी कथा*

*शाळा*

तस आमचं गाव म्हणजे लै आक्रीत च , शोधुन बी घावायच नाय . अस आमचं गाव “उप्परवाडी ” सगळ्या जगात उपर म्हंजी वर , खालच्या अंगाला कागवाड बाजुला म्हैसाळ तर वरच्या अंगाला तालुक्याचं गाव अथणी . गाव तस लै बेस पन मानस जरा रेम्या टाळक्याची ! जी ती स्वतःला लै शान समजत व्हती. गावाला वेस , वेसीवर मारुतीचं देऊळ , देवळांच्या माग वढा , सतत पाणी असलेला. वेसीतन वर आलं की हम चौक , चौका म्होर गावची चावडी , चवडीच्या डावीकड अंबाबाई च देऊळ , देवळामाग भली मोठी तालीम , तालमीत सदोदित कोण ना कोणीतरी गप्पा ठोकत बसल्याल . एक बहिरच्या बाजुला कट्टा , ह्या कट्याला डांबरी कट्टा का म्हणत्यात त्याच कोडंच हाय .कट्ट्यावर रिकामी टाळकी
चुगल्या करत बसल्याली असत . कोन बिडी वडतोय, तर कोन चिलीमीचा धूर सोडतोय,तर चांची सोडून तंबाखू चा बार भरतोय ,अस सगळं झ्याक चल्याल . गावच्या खालच्या बाजुला मिरजकड जाणार हम रस्ता . वेसीच्या भाईर एक पाण्याचं तळ . त्या तळ्याकाठी चरायला सोडलेली जनावर . जनावर बर असणारी त्यांची राखण करणारी बाया बाप्या अस सगळं हे झांगट हुत . गावच्या भानगडी तिथंच जुळत !
गावात हजार बाराशे चा उंबरा त्यात शेती वाडीत राहणारी येगळी ! शिकणारी कमी पण अकलेची ज्यादा , गावाला पहिली ते सातवी शाळा नुकतीच मंजूर झालेली ! तीन चार वर्षे शाळा भाड्याने कुठं कुठंतरी भरत हुती .
मराठी मॉडेल स्कुल अस शाळचे नाव , पण पाटी कुठंबी दिसत नव्हती !
कारण बी तसच हुत शाळा भाड्याच्या घरात चालत हुती!
दोन तीन तुकड्या खोताच्या घरात तर ,दोनतीन तुकड्या काटे च्या घरात , एक शेवटची तुकडी थेट मारुतीच्या देवळात .
शाळेचं हेडमास्तर श्री दत्तवाडे गुरुजी ज्याम वैताकलेलं . शाळेला स्वतःची इमारत पाच वरसानी मंजूर हुनार हुती , पाच वर्स शाळा तग धरून ठेवायची हुती . शाळत पट संख्या वाढवुन परगती करून दाखवावी लागणार हुती !

सकाळी सकाळी शाळेची घंटा झाली तशी पोर जमा व्हायला लागली . अंगणात पोर जमा झाल्या झाल्या , पवार गुरुजी नी शिट्टी वाजवली तशी पोरांनी , एकामाग एक उभारत तीन लायनी केल्या , सावधान विश्राम झालं , प्रार्थना झाली . तस मुलंमुली जाऊनआपापल्या जागेवर बसली . तास दीड तास झाल असत्याला नसत्याल , तसं “पोष्टमन गजु” आला अन हेड मास्तरांच्या टेबलावर डाक ठेवून गेला.
हेडमास्तर मुलांना पाढे शिकवत हुते ,त्यांचं लक्ष्य पोष्टमन कड गेलं . त्यो गेल्या गेल्या त्या डाक कडे गेलं , तस त्यांनी ते पाकीट फाडल व वाचुन जरा खाली मान घालुन बसले . चसम्याच्या काचा पुसल्या , डाक वाचली तस त्यांनी लगेच सगळ्या मास्तर लोकांना बोलीवल व पाकिटातील मजकुर सांगितला . सगळे च मास्तर लोक गप्पगर ! तस पोरांचा पण गलका वाढत हुता . आजपासुन तीन दिवसांनी शाळच इंस्पेक्शन हुनार ! तालुक्याहुन अधिकारी येऊन शाळा तपासणी करून जाणार हुता तस सगळी मास्तर लोक डोकं धरून बसल्याली हुती !
कारण बी तसच हुत पटावर मुलांची संख्या 500 च्या आसपास पहिले ते सातवी धरून ! दत्तवाडे गुरुजींचे मस्तक खवळलेल , एकदम पित्त उठल्या सारख होवुनश्यान तडक उठले , ते मारुतीच्या देवळात पहिली व दुसरी तुकडी बघाय गेले .
बघत्यात तर काय तिथल्या सरला मॅडम गायबच होत्या !
दोन्ही तुकड्या ची मिळुन, शंभर वर असलेली पटसंख्या जेमतेम तीस बत्तीस मुलं च हुती . काहीमुल देवळाच्या शिखरावर जाऊन मारुतीचा अवतार असल्याची साक्ष दाखवुन देत होती , तर काही मुलांच्या हातात घनघट घेऊन त्यावर लावलेली चिंच मिठाची गोळा तोंडात धरून ,चोखत बसल्याली हुती . तर काही मुलं हुंदडत हुती . काही मुलं मारुतीच्या गाभाऱ्यात जाऊन घंटा बडवत हुती . हा असला नजारा बघुन दत्तवाडे मास्तरांनी कोपऱ्याअसलेली काठी घेऊन, मुलांना बडवायला चालु केल्या केल्या, सगळी पोर भराभर खाली उतरली व आपापल्या जागी जाऊन बसली . तेवढ्यात दोनचार मूल आपापली ढुंगणावर ची चड्डी वर सरकवत आत अली . एका मुलाच्या नाकातून पिवळसर चिकट शेम्बुड बाहेर येत होता, तसच त्यो त्यांनी वर ओढत आपली जागा घेतली . गणप्या खिशातून चिरमुर काढून तोंडात कोंबत शाळेत आला , तस मास्तरांनी त्याला पाठीत धपाटा दिला व विचारलं “बाई कुठं हैती बघुन ये.” तस तोंडातला चिरमुर गिळुन म्हटला . “बाई लव्हाराच्या शाळत हैती म्या येता येता त्यांना बघितला व हटकल बी “. हे ऐकून मास्तरांच पित्त आणखी उठलं !
मुलांची शाळा सोडून बाई तिथं रामा लव्हार कड जाऊन बसत्यात हे सगळ्या उप्परवाडी ला म्हैत हुत .
तस दत्तवाडे गुरुजींनी आपला मोर्च्या त्या लव्हारकड वळवला . हळुच कानोसा घेत बघत्यात तर काय , तिथलं दृश्य येगळ च हुत बाई त्याच्या घरात बांधलेल्या झुल्यावर बसुन मागं म्होर , मागं म्होर झुलत होत्या . अन ह्यो रामा लव्हार म्हणत्याला तिथंच भाता मारत जाळ उठवीत होता . अन वर रामा म्हणतोय कसा ” बाई लै झालं तुमचं साळेच खूळ , एकडावं शेताला जाऊन येऊ या , तिथंच बसुन जेवण करून येऊ या , तेवढंच तुम्हाला बी
कामातून अराम मिळलं बघा”. ह्या येतेल्या ऐतवारी जाऊ की . जेवण मी बांधुन श्यान घेतो तुमी काय बी काळजी करू नगसा . मग तर झालं , असं जरा मेतकूट शिजून
भरून येत हुत , तेवढ्यात दस्तुरखुद्द हेडमास्तर आल्याल बघुन श्यान दोघांची बी तोंड काळी ठिक्कर पडली ! तस रामा लव्हारन “नमस्कार गुरुजी या या ” अस म्हणत त्यान खुर्ची पुढं ठेवली . सरला मॅडम नी झोपाळा सोडला व आवंढा गिळत म्हटलं , सर देवळाच्या मागचं पत्र वाऱ्यानी उचकटल्या त, ते नीट बसवुन ह्यांच्याकडन ते काम करून घ्यावं , अस सांगावा द्यावं म्हणुनश्यान इथं अली हुते . तस लगेच रामा बी म्हणाला “ह्या ऐतवरी ते काम करीन बघा .” तस गुरुजीं म्हणाले ते कवा बी होईल ! पण , बाई “आत्ताच्या आत्ता सगळ्या मुलांच्या घरी जावा त्यांच्या पालकांना भेटा “. दोनतीन दिवसात इंस्पेक्शन हाय जेवढी पटावर संख्या हाय तेवढी शाळत बी दिसली पाहिजे समजलं !अशी तंबी च देत गुरुजी थेट खोताच्या वाड्यातील शाळ कड गेलं .

जवळ जवळ म्हसरांच्या गोठ्यात , ही तुकडी कशीबशी बसली हुती . बाजुला असलेल्या वर्गात शेणाचा वास दरवळत व्हता , मुख्याध्यापक तसच म्हसरासनी बाजुला करून आत गेले . बघ्यातत तर काय ! धोंड्या म्हणत्याल पोरग चिंगीच्या वेणीला रेबिनीन चिंच बांधत व्हता ! तर गण्या माग बसुन शेंगा खात व्हता ! गुरुजी आल्यावर समदी पोर उठली, ” एकसाथ नमस्ते ” म्हणाली व बसली . शाळेचा कोरम काय फुल्ल झाल्याला नव्हता . फकस्त 12 मुलं दिसली तस गुरुजींनी सगळ्या मुलांना ,” तुमच्या गल्लीतील सर्व वर्ग मित्रांना ताबडतोब घरी जाऊन, भेटून बोलवुन घेऊन या अस फर्मान जारी केलं “. तस सगळी पोर उड्या मारत बाहेर पळाली खरी , पण चिंगीची वेणी बघुन सगळी फिदीफिदी हसत सुटली. त्याची खबरबात दस्तुरखुद्द चिंगीला पण नव्हतीच !
सगळी मुल घरी जाऊन पोटभर न्याहरी केली , मग आपापल्या वर्ग मित्रांच्या घरी धड़कुन आली . परत शाळेत आल्या वर गुरुजीना रिपोर्ट दिला . “धोंड्या काय झालं ” ? गुरुजींनी विचारताच , धोंड्यान पाढाच वाचला , विठ्या मोरे “म्हसर घेऊन तळ्याकड गेलाय ,” सायद्या “खुरप दोर घेऊन शेताला” गेलाय , “जग्या पाटील गावाला गेलाय त्याच्या अत्याकड ,” अन बंड्या माने नांगुर धरायला गेलाय ! सिरपा परीट भट्टीची कपड द्यायला गेलाय !
अस परतेकानं आपल्या वर्ग मित्राचा पाढा वाचला तस , गुरुजींचे डोकं सटकलच !, गुमान भायर येऊन , एकदम दोन विड्या तोंडात धरून, काडी लावली व भसाभास धूर सोडत
ऑफिस कड आले !असत्याल नसत्याल तोपरतूर तालुक्याचा शिपाई आला . त्याच्या हातात कागदाचे भेंडोळ बघुन परत मुख्याध्यापक च्या काळजात चर्रर्र झाले !
तालुक्यातील तो शिपाई म्हणाला “आधी त्वांड गोड करा” गुरुजी मगच हे कागुद व रिपोर्ट देतो. म्हटल्यावर , गुरुजींचा जीव जरा भांड्यात पडला . काय आणलास आत्ता आणी माज्या बाबा !अस म्हटलं खर , त्याच्या साठी शाळतल्या शिपाई ला पाठवून त्याची येवस्था करावं लागली . गुरुजींनी त्याला ” भज व बुंदया च्या लाडवाचा “निवद ” दावल्यावर मग कुठं त्याच त्वांड उघडलं ., काय बी काळजी करू नका , गुरुजी , फकस्त ह्या कागदावर तुमच्या शाळचे सही शिक्के मारा .
” राज्य सरकारने तुमच्या नवीन शाळची इमारतिला मंजुरी दिली हाय . ” अस म्हटल्यावर गुरुजी आ करूनच बसलं ! सरकारी माणूस आला तसा काम करून गेला . गुरुजींनी मात्र अजुनी त्वांड आ करूनच बसलं व्हत !!
शाळेचं इंस्पेक्ष्ण रहीत झाल्याल व्हत !!

 

प्रो डॉ जी आर ( प्रवीण) जोशी

अंकली ता चिकोडी जिल्हा बेळगाव पिन कोड 591213
सेल नंबर 9164557779

कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा