You are currently viewing “पाऊले चालली पंढरीची वाट

“पाऊले चालली पंढरीची वाट

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… गझल प्राविण्य… गझल मंथन समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.शोभा वागळे यांचा भक्तिमय लेख

आषाढी पंढरपूर वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा.
पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक, भाविक भक्त स्त्री-पुरूष, भक्ती-भावाने माऊलीच्या ओढीने, एक-रुपाने, जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.
महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा असते.
वारी महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.
ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा असते. हा एक अतिशय आनंदी सोहळा असतो.
आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होते. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नसतो तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव असतो. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.

*माळकरी/वारकरी*
वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे भक्त असतात.
आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करत असतात. भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. *(माळकरी)* ह्या माळेच्या उपयोग जपमाळ म्हणून करतात तसेच ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नसते असे वारकरी पंथ सांगतो.
स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूर वारी करावी तसेच एकादशी व्रत करावे. सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे’ असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितलेला आहे. असे सगळे नियम वारकरी पाळतात.
वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम  पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष करतात. या जयघोषाला वारकरी महाघोष म्हटले जाते.
आषाढी वारी – सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात.
कार्तिकी वारी – संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात.
या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात.

*पालख्या*

*ज्ञानदेवांची पालखी :-* हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.

*तुकोबांची पालखी :-*
तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच आणि देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत.
निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात. ज्ञानोबा -तुकारामच्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपारिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात.

*दिंडी*
वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी; पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
वारीला जाणा-या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असतो. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते. ह्या वारीची शिस्त, शांत-भक्तीमय वातावरण, एकतेचे प्रतिक, रिंगण सोहळा आणि सारेच विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन भक्तीमय वातावरण अतिशय विलोभनीय व पाहण्यासारखे असते. प्रत्येक विठ्ठल भक्ताने एकदा तरी जीवनात अशा वारीचा -दिंडीचा सुखद अनुभव घ्यावा आणि पंढरीला पांडरंगाचे दर्शन घ्यावेच.

शोभा वागळे
मुंबई.
8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =