You are currently viewing मन:सृष्टीतील शब्द ऋतू

मन:सृष्टीतील शब्द ऋतू

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन – रायबागकर यांचा अप्रतिम ललितलेख

शिशिर ऋतूतील ती पिवळी पानगळ, शुष्क, उदासवाणे वृक्ष, उजाड निसर्ग, आणि या सर्वांचा परिपाक म्हणून मनावर चढलेलं औदासिन्याचं मळभ…शिशिरात वाऱ्याच्या वावटळीने उडणाऱ्या त्या पाचोळ्यासोबतच माझे शब्दही जणू भिरभिरत होते विचारांच्या भोवऱ्यात…कितीही पकडू पाहत होते पण…दमछाकच झाली फक्त…हाती लागलं नाही काहीच…त्या पानगळी सोबत
विचारांच्या आवर्तात भोवंडून गेला माझ्या मन:सृष्टीतील शब्दांचा ऋतू…ना सूर सापडले ना शब्द…थकुन विसावले अखेर तशीच…श्रांत, क्लांत, नि:स्तब्ध…हारे हुये खिलाडी की तरह…

हा उदासवाणा ऋतू
हे मळभ तन-मनावरचे
कसे सारावे समजेना
हे सावटऔदासिन्याचे

आणि एक दिवस…नवी हिरवी, पोपटी, तांबूस चैत्रपालवीच्या चवऱ्या ढाळत, लाल, पिवळ्या, केशरी फुलांचे दिमाखदार नजराणे घेत आपल्या आगमनाची वर्दी देत आला…ऋतुराज वसंत…अवघी सृष्टी सिद्ध झाली स्वागताला त्याच्या…कोकीळाने लावला स्वर पंचमात…वाहू लागला आसमंतात सुगंधी समीर…सारं वातावरण प्रसन्न, चैतन्यानं भारलेलं…आणि…

बोलू लागला माझ्या मनातलाही रावा…उठ, झटकून टाक ती मरगळ, बाहेर ये त्या ग्लानीतुन…बघ तर…अवघी प्रसन्नता ओसंडून वाहतेय चराचरातून…मी किलकिले केले माझे डोळे हलकेच…खरंच की…थांबला वाटतं तो चक्रवात…दूर दूर गेलेली ती शब्द-पर्णं थोडीफार सापडताहेत आता कुठे कुठे…रूपही पालटलंय त्यांचं…नवी कोवळीक, नवी चकाकी, नवा तजेला लेवून आलीत माझ्यापुढे…पण… ह्या ग्रीष्म ऋतूच्या तप्त उष्ण झळा…नका, नका हो करू अशी होरपळ…
अजून संपूर्णपणे न गवसलेल्या तरीही जणू नवा साज चढवु पहात असलेल्या
माझ्या मन:सृष्टीतील शब्दपर्णांची…येऊ द्या शीतल जलधारा…मिळु द्या नवसंजीवन

वसंत येवो ना येवो,
होवो ग्रीष्माने जळजळ, वा
होवो शिशीरातील पानगळ
वर्षा-मायेच्या अमृत वर्षावात
मिळून चैतन्य संजीवन
त्याची लागणार ना झळ

टप् टप् टप्…कसला बरं हा आवाज…एका लयीतला…आणि हा ओलेता दरवळ…नाकातून थेट पाझरलाय रंध्रारंध्रात…भिनलाय माझ्या रोमारोमात…हूं…खोल…खोल…आत…आणखी आत…पुलकित झालंय तन-मन…चैतन्याची लहर पसरलीय…वर्षानुवर्षं अनुभवलेला हा परिमळ…तरीही तेवढाच ताजा, तितकाच हवाहवासा…ही मृदा आणि हा पहिला थेंब…जन्मोजन्मीचे सांगाती…साजरा करतात या क्षणाला असा मत्त गंध देऊन…

आणि ह्या अविरत झरझरणाऱ्या पागोळ्या…कुठेतरी अडून राहिलेले शब्दही असेच झरावेत माझ्या झरणीतून…त्या शब्दधारा बरसाव्यात या देखण्या पागोळ्यां प्रमाणेच…झरतील ना? बरसतील ना?

नक्कीच…सचैल, सुस्नात झाल्यामुळे टवटवीत दिसणाऱ्या या वृक्षवल्लींप्रमाणे नव्याने कात टाकतील माझे शब्दही…

सृष्टीचा ऋतू झरला जसा
वृक्षवल्लरींच्या पानापानातून
माझ्या मन:सृष्टीतील शब्द-ऋतूही
झरेल पानापानातून
आणि…
अक्षरं धरतील फेर
झर् झर् झरणीतुन

भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334
२८-६-२२

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 16 =