आंबोली घाटात भरधाव कंटेनरची कारला जोरदार धडक; अपघातानंतर चालकाने केला पळ काढण्याचा प्रयत्न
झाराप झिरो पॉईंटवर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने पकडले; वाहनांचे मोठे नुकसान, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
सावंतवाडी :
हैदराबादहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने आंबोली घाटात दोन वाहनांना धडक देत अपघात घडविल्याची घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या कंटेनर चालकाला पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाराप झिरो पॉईंट येथे ताब्यात घेतले. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद ते कुडाळ असा प्रवास करणारा कंटेनर (TG 07 E 4751) आंबोली घाटातून जात असताना केसरी गावाजवळील एका तीव्र वळणावर चालक परमेश्वर वर्मा याने वाहन अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवले. याचवेळी कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या सियाझ कारला (MH 03 CB 8619) कंटेनरने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचे मोठे नुकसान झाले. तसेच जवळच उभी असलेल्या टाटा पंच वाहनाच्या उजव्या बाजूच्या आरशालाही कंटेनरची धडक बसली.
दुचाकीस्वारांचा पाठलाग; चालकाला पळून जाण्यात अपयश
अपघातानंतर चालकाने मदतीसाठी न थांबता कंटेनरसह कुडाळच्या दिशेने पलायन केले. हा प्रकार पाहिल्यानंतर दोन दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग केला. बुरडी पुलाजवळ चालकाला थांबविण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याने दुचाकीस्वारांना हुलकावणी देत पुन्हा वाहन पुढे नेले.
झाराप झिरो पॉईंटवर आवळल्या मुसक्या
दुचाकीस्वारांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर झाराप झिरो पॉईंट येथे तैनात ट्रॅफिक पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवत रस्ता अडवला. अखेर कंटेनर आणि चालकाला तेथे थांबवून ताब्यात घेण्यात आले.
मारहाणीचीही चर्चा; वैद्यकीय तपासणी सुरू
या प्रकरणी अतिवेगाने व धोकादायक पद्धतीने वाहन चालवून अपघात घडवणे तसेच अपघातस्थळावरून पळून जाणे याप्रकरणी चालक परमेश्वर वर्मा याच्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, अपघातानंतर संतप्त नागरिकांकडून चालकाला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबतही पोलिसांकडून कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. तसेच कंटेनर चालक आणि सियाझ कार चालक यांनी मद्यप्राशन केले होते का, याची खातरजमा करण्यासाठी दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
