You are currently viewing “सोशल मिडियामुळे होणारे फायदे व नुकसान..”

“सोशल मिडियामुळे होणारे फायदे व नुकसान..”

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

कोणते ही नवे तंत्रज्ञान आले की ही चर्चा हमखास
सुरू होते . होणारच , कारण त्या विषयी असणारी
उत्सुकता व भविष्यात त्याचे होणारे परिणाम या
विषयी माणूस चिंताक्रात असतोच. सोशल मडियाचा
कधी नव्हे इतका सुळसुळाट व प्रसार आता झाला आहे
याचे मुख्य कारण आहे मोबाईल व टी व्ही. किंवा
इतर प्रसार माध्यमे होत.

आता या दोन्ही गोष्टी हव्यात की नको हा प्रश्न ही
अनाठाई आहे इतक्या त्या आपल्या अंगवळणी
पडल्या आहेत नव्हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग
बनल्या आहेत. फार पूर्वी जेव्हा जेट विमाने आली तेव्हा
असाच गलबला झाला होता, आवाज , प्रदूषण वगैरे
वगैरे. त्यावर उत्तरही सायन्स देते.कोणती ही नविन गोष्ट आली की ही चर्चा होणे अत्यंत स्वाभाविक आहे व त्यात गैर काही नाही.तसेच आता सोशल मिडियाची चर्चा होणारच . नवे
तंत्रज्ञान व त्यावर आधारीत ह्या गोष्टी होणारच आहेत .
आपले आता ह्या गोष्टींशिवाय पान हलत नाही मग आपण
त्यांना आपण दूर ठेऊ शकणार आहोत का?

कोरोना काळात तर सोशल मिडियाने समाज जिवंत ठेवला
मृत होऊ दिला नाही , पटापट बातम्या एक मिनिटात इकडून
तिकडे जातात, सुख दु:खे कळतात.फोनवर माणसे एकमेकांना
बघतात, बोलतात , आणखी काय हवे. गेली दोन वर्ष काही का होईना अॅानलाईन शाळा चालू होत्या. नाही तर काय झाले असते? आता हा मिडिया ह्या मशिन्सवर चालतो त्या मशिनला काही अक्कल आहे का ? नाही. कुणाच्या डोक्याने चालतात ती? आपल्या. मग त्याचा सदुपयोग करायचा की दुरूपयोग हे कोण ठरवणार ? आपण.मग प्रॅाब्लेम कुठे आहे ?

तर प्रॅाब्लेम आपण आहोत . लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी प्रॅाब्लेम आपण असतो. त्याला मिडिया किंवा मशिन्स कसे
जबाबदार ठरतील? कसे वागायचे आपल्याला कळते ना?
मग आपण तसे वागतो का ? का नाही वागत याची उत्तरे
आपण प्रामाणिकपणे दिली पाहिजेत . सोशल मिडियावर
माणूस क्रियाशिल आहे, मशिन नाही. ते मशिन तुम्हाला
मदत करते. ते अल्लाउद्दिनच्या दिव्या सारखे कसे वापरायचे,
त्याच्या कडून फायदे करून घ्यायचे की तोटे हे शेवटी माणूसच
ठरवणार ना? मग डोके ठिकाणावर ठेवूनच त्याचा वापर
करायला हवा ना? सोशल मिडिया म्हणजे कोणी भूत आहे का? आपणच त्याचे घटक आहोत ना ? मग , दुसरा वागतो
तो चुकीचा व मी वागतो ते बरोबर असे कसे ?

मंडळी ,सर्व गोष्टींना आपणच जबाबदार आहोत. म्हणून
तारतम्याने वागणे हेच आपल्या हातात आहे. स्वत:ला भरकटू
द्यायचे नाही, मनावर ताबा ठेऊन हा मिडिया आपल्या
कल्याणा साठीच वापरला पाहिजे हे आपल्याला चांगलेच
कळते.कोविड काळात त्याचा फायदा झाला व दुरूपयोग ही
झाला याला जबाबदार कोण ? तर आपणच!
मंडळी, सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या जवळच येऊन पोहोचतात
ना ? मग काय म्हणणे आहे आपले ?भरपूर लिहिता येईल
पण थांबते …

हो , नेहमी प्रमाणे ही मते फक्त माझी आहेत …

प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १५ जून २०२२
वेळ : रात्री ८ : २६

प्रतिक्रिया व्यक्त करा