You are currently viewing आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना सविनय दंडवत.

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना सविनय दंडवत.

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज,

यांना सविनय दंडवत..

 

राजा कसा असावा? हा प्रश्न जगात कुणालाही विचारला तर त्याचे उत्तर एकच,” राजा असावा तर शिवाजी सारखा”.

महाराज ! नुसत्या आपल्या नामोच्चाराने आम्ही रोमांचित होतो! शिवरायासारखा एक जाणता राजा या देशात, महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला, आणि त्याने कधीही विसर न पडणाऱ्या पराक्रमाचा, संस्काराचा, नैतिकतेचा, महान इतिहास घडवला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहेच.

व्हिएतनाम आणि अमेरिकेत वीस वर्षे युद्ध चालले. अमेरिकेला वाटत होते की या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल. पण युद्ध लांबले. अमेरिकेस माघार घ्यावी लागली. व्हीएतनामचा विजय झाला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या राष्ट्रपतींना त्यांच्या विजयाचे रहस्य विचारले असता, ते उत्तरले,

” युद्धकाळात हिंदुस्थानातील एका शूर राजाचे चरित्र माझ्या हाती आले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आम्ही युद्धनीती ठरवली. आणि ती ठामपणे राबवली. आणि आम्ही विजयी झालो.”

पत्रकारांनी विचारले,” तो हिंदुस्थानी राजा कोण?”

राष्ट्रपती उत्तरले, छत्रपती शिवाजी महाराज. हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केले असते.”

याच राष्ट्रपतींनी स्वतःच्या मृत्यूपूर्वी आपली अंतिम इच्छा लिहून ठेवली होती की,

” माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिले जावे”

. “छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्थ झाला!”

आणि आजही त्यांच्या कबरीवर हे वाक्य वाचायला मिळते.

महाराज असे तुम्ही! जगाचे आदर्श राजे. आपल्याबद्दल म्या पामराने काय आणि किती बोलावे?

शिव म्हणजे पावित्र्य, मांगल्य, सौंदर्य आणि शक्तीही. आपल्या नावानेच आमचे हृदय उचंबळते.

पण महाराज आज या पत्राच्या निमित्ताने, एक खेदही व्यक्त करावसा वाटतोय् . आज कुठेतरी आपल्या ऐतिहासिक नावाचा, आदर्शाचा, पराक्रमाचा केवळ दुरुपयोग केला जातोय. स्वार्थी माणसे निमित्त साधून भांडणे, दंगली माजवतात. झुरळ मारायची ही शक्ती नसलेली ही माणसे, केवळ मतांसाठी छाती फुगवून, “आम्ही शिवरायांचे वंशज आहोत!” अशा आरोळ्या ठोकतात. याचे प्रचंड दुःख होते. मान खाली जाते. लाज वाटते.

महाराज! या अशा रणछोडदासांसाठी मी आपली नम्रपणे क्षमा मागते. आणि यांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना ही करते.शिवाजीचे वंशज म्हणून त्यांना खरोखरच अभिमान असेल तर त्यांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास करावा.लोकनेता कसा असावा याचे ज्ञान मिळवावे.

आपली,

प्रयत्नपूर्वक आपले आदर्श जपणारी कुणी एक…

 

राधिका भांडारकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + nineteen =