You are currently viewing आशिये ग्रामपंचायतीतर्फे १३ जून रोजी मोफत आरोग्य शिबिर

आशिये ग्रामपंचायतीतर्फे १३ जून रोजी मोफत आरोग्य शिबिर

तज्ञ डॉक्टरांकडून विविध तपासण्या; आयुष्मान कार्ड व एचपीव्ही लसीकरणाचीही सुविधा

कणकवली :

आशिये ग्रामपंचायतीच्यावतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय येथे होणाऱ्या या शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सरपंच महेश गुरव यांनी केले आहे.

या आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर), रक्त तपासणी, ईसीजी, एक्स-रे, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल तसेच डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांसाठी एचपीव्ही लसीकरणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हृदयरोग व एचपीव्ही लसीकरणाबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असून डोळ्यांची तपासणी व चष्म्यांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांची निवड ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे. कमी वजनाच्या बालकांचीही तपासणी केली जाणार आहे.

शिबिरादरम्यान आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड व आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे.

तसेच थायरॉईड, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर तपासणीसाठी नागरिकांनी उपाशीपोटी सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे. या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच महेश गुरव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा