शाळा सुरू होताच शेकडो विद्यार्थी कोरोना बाधित; पालक काळजीत

शाळा सुरू होताच शेकडो विद्यार्थी कोरोना बाधित; पालक काळजीत

दिनांक 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनीही तयारी सुरु केली आहे. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग लवकरच सुरु केले जाणार आहेत. मात्र, बहुतांश शाळांनी पालकांकडून ‘आपण स्वत:च्या जबाबदारीवर आमच्या पाल्याला शाळेत पाठवत असल्याचे घोषणापत्र लिहून घ्यायला सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकांच्या चिंतेत भर घालणारी बातमी आली आहे. त्यामुळे आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालकांना ठाम निर्णय घ्यावा लागणार आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटात विविध राज्यांनी सावधगिरीने शाळा उघडण्यास सुरवात केली आहे. पण हरयाणातून आलेला एका बातमीने चिंता वाढू शकते.

रेवाडीच्या 12 शाळांमध्ये करोना तपासणी करण्यात आली. यात 72 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. इतकेच नाही तर जींदमध्ये 66 जणांना (आठ शिक्षक आणि 11 शालेय मुले) कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

सणांमुळे नागरिकांचं फिरणं वाढलं आहे. यामुळेच आम्ही 12 शाळांमधील 867 विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यात एकूण 72 मुलं करोना पॉझिटिव्ह आढळून आले, असं नोडल अधिकारी विजय प्रकाश यांनी सांगितलं. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्या शाळा दोन आठवड्यांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. मास्क वापर आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्‍यक केलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण यंत्रणा बंद करता येणार नाही, असं हरयाणाचे शिक्षणमंत्री कंवरपाल गुर्जर म्हणाले. देशाच्या विविध भागांत शाळांमध्ये हे चित्र दिसले तर कोरोनाची दुसरी लाट फैलावू शकते. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमीच असल्याने ते या आजाराने पटकन बाधित होऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील पालक चिंतेत पडले असून, शाळा जर जबाबदारीच घेणार नसेल, तर मुलांना शाळेत पाठवून संकट कशाला ओढवून घ्यायचे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा