You are currently viewing कुडाळ एमआयडीसी चौपदरीकरण रस्त्यावर तातडीने दिशादर्शक फलक लावा; अन्यथा आंदोलन

कुडाळ एमआयडीसी चौपदरीकरण रस्त्यावर तातडीने दिशादर्शक फलक लावा; अन्यथा आंदोलन

कुडाळ एमआयडीसी चौपदरीकरण रस्त्यावर तातडीने दिशादर्शक फलक लावा; अन्यथा आंदोलन

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा एमआयडीसी प्रशासनाला इशारा

कुडाळ :

कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय ते एमआयडीसी नाका दरम्यान नव्याने करण्यात आलेल्या चौपदरीकरण रस्त्यावर तातडीने दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसवावेत, अन्यथा एमआयडीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी शुक्रवारी एमआयडीसीच्या उपअभियंत्यांना सादर केले. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, संबंधित रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून काम करणाऱ्या ठेकेदाराकडून रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक बसविणे अपेक्षित होते. यापूर्वीही या संदर्भात एमआयडीसी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

दरम्यान, काही दिवसांत शाळा सुरू होणार असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहतूक वाढणार आहे. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्यावर तातडीने दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसविण्याची गरज असल्याचे गावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
येत्या चार दिवसांत संबंधित काम पूर्ण न झाल्यास एमआयडीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अभिषेक गावडे यांनी एमआयडीसी प्रशासनाला दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा