जिल्हा बँकेत बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांची बैठक; नवीन व्यवसाय निर्मिती व क्लस्टर विकासावर भर
सिंधुनगरी / (प्रतिनीधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय निर्मितीस चालना देण्याच्या उद्देशाने ही प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संचालिका सौ. नीता राणे, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रमोद गावडे,जिल्हा नाबार्ड प्रबंधक सौ.दिपाली माळी, रिझर्व्ह बँकेच्या श्रीम. बेनझीर शेख, सिंधुदुर्ग जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.ऋषिकेश गावडे तसेच जिल्ह्यातील ३७ बहुउद्देशीय महिला संस्थांचे प्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की, प्रत्येक संस्थेने आपल्या परिसरात उपलब्ध संसाधने,बाजारपेठेची मागणी आणि कौशल्याचा विचार करून उत्पादनाची निवड केली पाहिजे. प्रत्येक संस्थेने वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने तयार करण्यावर भर दिल्यास उत्पादनामध्ये विविध निर्माण होईल उत्पादनांचा पुरवठा अधिक सुलभ होईल तसेच वाहतूक खर्चातही ही बचत होईल जिल्ह्यातील महिला उद्योग संस्थांना केवळ बचत गट चळवळी सारखे स्वरूप न देता एक ‘इंडस्ट्री’ म्हणून ओळख निर्माण करून दिली पाहिजे.
प्रत्येक संस्थेने आपले युनिट तयार करून कोणता व्यवसाय करायचा हे निश्चित करावे. चार-पाच संस्थांनी एकत्र येऊन एकच व्यवसाय निवडावा व क्लस्टर तयार करावे. जिल्ह्यात किमान ५० महिला औद्योगिक संस्था रजिस्टर करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहीजे आठ तालुक्यांमध्ये या संस्थांचे पाच विभाग तयार करावेत मार्केटिंग, कोल्ड स्टोरेज, ब्रँडींग, प्रोसेसिंग या सर्व बाबी एकत्रित करून एकच प्रॉडक्ट म्हणून बाजारात आणले पाहिजे, जेणेकरून ते उत्पादन जिल्ह्याबाहेर जाईल.
जिल्ह्यातील महिला संस्थांना व्यवसायाभिमुख करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
