You are currently viewing वेगळं व्हायचंय मला

वेगळं व्हायचंय मला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रेरणा वाडी यांचा अप्रतिम लेख

लहानपणी गणेशोत्सवात जमिनीवर पोतं टाकून पाहिलेलं एक नाटक आठवलं.*वेगळं व्हायचंय मला* पुढे याच धर्तीवर *संसार* नावाचा पिक्चरही आला होता.
त्या काळामध्ये ही थीम किंवा मध्यवर्ती कल्पना वेगळी होती.कारण त्यावेळेला कुणी वेगळं होतंच नव्हतं.पण आजकालच्या मुलांना जर ही थीम ही कल्पना सांगितली तर त्यांना त्यात काही वेगळं वाटणारच नाही.कारण आजकाल सगळे वेगळेच तर राहतात एकत्रच राहत नाहीत.
पूर्वी संसार किंवा कुटूंब हा एक एकखांबी तंबू असायचा.
त्यात कुटुंब प्रमुखाची प्रमुख भूमिका असायची.आणि त्याच्या अधिपत्याखाली पूर्ण घर गुण्यागोविंदाने नांदत असे.”बडा बारदान, मोठं खानदान” म्हटल्या जाई त्याला. अर्थातच त्या वेळी घरात, समाजात किंवा देशांतही एकसत्ताच असायची.
या प्रमुखाची जबाबदारी असायची की कायदा आणि सुव्यवस्था ठेवायची.आणि ते काम अतिशय उत्तम प्रकारे करत असत. एकाच्या शब्दाला मान असल्यामुळे तोच नियम बनवत असेल कार्यकारिणी ठरवत असे (प्लॅनिंग) नियोजन आणि व्यवस्थापन (अॅडमिनिस्ट्रेशन) दोन्ही त्याच्याच हातात राहात असे.
काय आहे कुठलीही गाडी एका ड्रायव्हरच्या हातात असते तोपर्यंत फक्त छान चालते.पण चार हातांनी चालवली तर तिचा खटारा बनतो.यापूर्वीच्या एकसत्ताक पध्दतीला तडा बसला याचं कारण ज्याच्या हाती सत्ता होती तो सत्ता धुंद होऊन हुकूमशाही गाजवू लागला.आणि त्याचा बाकीच्यांना जाच होऊ लागला.शेवटी कोणी किती ऐकायचं याला काही मर्यादा असतेच.आणि त्यातूनच बंडाची ठिणगी पडायला लागली.
शिक्षणाचा प्रसाराने अधिकारांची जाणीव झाली.आणि यातूनच नाही पटलं तर वेगळं व्हा हा एकच मार्ग सुचायला लागतात.कुटुंबात, समाजात, राजकारणात सगळीकडे प्रत्येक जण वेगळी चूल मांडायला लागला.
अर्थातच वेगळं झाल्याने काही समस्या नक्कीच कमी झाल्या.दडपशाही, हुकूमशाही, अन्याय नक्कीच कमी झाले.स्वावलंबनाने स्वतः चं सामर्थ्य कळायला लागलं.त्यामुळे नवीन स्वप्न साकार झाल्यासारखं वाटायला लागलं. पूर्वी अर्थार्जनाचा मार्गही शेती किंवा धंदा असायचा तो घरातले सारेजण मिळून चालवायचे.त्यामुळे वेगळं होणं सहज शक्य नव्हतं.आजकाल प्रत्येकाची शिक्षण नोकरी राहण्याच्या जागा वेगवेगळ्या झाल्या.त्यामुळे वेगळं होणं सहज शक्य झाले.
आता खरंच वेगळं होण्याची गरज आहे का?याचं उत्तर “हो” असं नक्कीच निघतं. त्यामुळे वेगळे होण्याचे हे काही फायदे आहेतच .
जबाबदारीची जाणीव होते.संकटांना अडचणींना तोंड देण्याची हिम्मत वाढते.आणि म्हणतात नं दूर राहून प्रेम वाढतं.तर जवळजवळ राहून भांड्याला भांड लागण्यापेक्षा दूर राहून गोड राहणं केव्हाही सोयीस्कर.
आजकाल तर मायबापच आपल्या मुलांना लग्न झाल्याबरोबर वेगळं करून देतात.पाश्चात्य देशांमध्ये ही स्वनिर्भरता लहानपणापासूनच शिकवली जाते.स्वाभाविकच त्याचे फायदे दिसल्यामुळे वेगळं होत होत आता प्रत्येक घरामध्ये वेगळे वेगळेच राहतात.घरात समाजात राजकारणात सगळीकडे आजकाल प्रत्येकाला स्वत च्या हक्कांची जाणीव झाल्यामुळे प्रत्येक जण वेगळंच राहू इच्छितो.
पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच. ज्या गोष्टीचे काही फायदे असतात त्यांचे काही तोटेही असतात. म्हणतात नां Too many cooks spoil the kitchen.सगळेच हुशार झाले तर कुणाचाही पायपोस कुणाच्या पायात राहत नाही.माघार घेणे समजून घेणे वगरे गोष्टी कालबाह्य होतात.आणि शेवटी पुन्हा मनमानीच सुरू होते.
जेव्हा चार लोक मिळून असतात तेव्हा चार कामं, खर्च सगळेच वाटले जातात.
सुख दुः खात अडीअडचणीत एकमेकांची मदत होते.पण आता प्रत्येकजण स्वतःमध्येच इतका गुरफटला जातो की आपुलकी, प्रेम, मदत या गोष्टी दूर राहतात.
जेव्हा लाकडाची मोळी एकत्र बांधली असते तिला तोडणं कठीण असतं परंतु जर एकेक लाकूड घेऊन तोडायला गेलो तर तो सहज तुटतो ही गोष्ट खूप आधी आपण शिकलोयं.
पूर्वी आपल्या देशातसुद्धा असेच पायलीचे पन्नास राज्य झाले आणि आपसातल्या दुहीमुळेच शेवटी परकीयांनी येऊन आपल्या देशावर तीनशे वर्षे राज्य केले.
घरात कुटुंबातसुद्धा वेगळं राहिल्यानंतर एकत्र राहण्याची किंमत कळू लागते.आजतर बहुतेक घरांमध्ये नवरा बायको दोघंही नोकरी, धंदा करतात त्यामुळे त्यांना माणसांची गरज असते.लहान मुलांच्या दृष्टीने, वडीलधाऱ्या लोकांच्या दृष्टीने एकमेकांचा आधार आवश्यक असतो.एक विभक्त कुटुंबात ते मिळत नसल्यामुळे शेवटी पाळणाघर, वृद्धाश्रम यांचा आसरा घ्यावा लागतो.तिथे काय प्रकार चालतात हे आपल्याला माहितीसुद्धा नसते.मग त्यापेक्षा आपल्या घरातच जर पुन्हा एकदा थोडंसं समजूतदारीने घेतलं तर ठीक नाही काय होणार?
खूप छान कविता आहे “ऊन ऊन खिचडी साजूक तूप वेगळं व्हायचं भारीच सुख”
या कवितेत वेगळं व्हायचं सुख नसून कसा त्रास होतो हे पण सांगितलं आहे.
त्यामुळे आज पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतंय आता वेळ आली आहे की लेखकांनी आता नवीन नाटक लिहायला घ्यावं *एकत्र व्हायचंय आम्हाला.*

सौ प्रेरणा प्रदीप वाडी
नागपूर
मो.९३०९९०७१८६
दि १६/०२/२०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 19 =