You are currently viewing मानवी जीवनाचा शेवट सांगणारा हायकू

मानवी जीवनाचा शेवट सांगणारा हायकू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित हायकूचे प्रशांत वाघ यांनी केलेले अप्रतिम रसग्रहण*

 

रसग्रहण – प्रशांत वाघ “(पॅसिफिक टायगर)”

 

*मानवी जीवनाचा शेवट सांगणारा हायकू* 

 

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील कवयित्री अरुणा दुद्दलवार यांची “तटस्थ” ही‌ हायकू प्रकारातील एक रचना‌ व्हाटस् ऍप समुहावर वाचायला मिळाली. अतिशय अर्थपूर्ण आणि मानवी जीवनाचा शेवट काय होतो याचं अत्यंत अर्थपूर्ण आणि सुंदर विवेचन करणारी ही रचना. या रचनेवर थोडसं लिहावं असं वाटलं – तत्पूर्वी हायकूबद्दल थोडसं-

खरं तर हायकू हा जपानी काव्य प्रकार. अतिशय कमी शब्दात जास्त अर्थ देणारी कविता म्हणजे हायकू. मराठी साहित्यात अष्टपैलू आणि थोर साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांनी हा प्रकार रूजवला.. कमीत कमी शब्दात अंतर्मनातील अचूक व अगदी योग्य अशीच भावना व्यक्त करणे म्हणजेच हायकू. शिरीष पै यांची एक हायकू रचना वाचण्यासाठी इथे देत आहे – “नको रे धरूस चिमटीत, फुलपाखराचं नाजूक अंग, दुखतोय… पंखांवरला रंग.” अशा अत्यंत कमी शब्दात जास्त अर्थ देणारी रचना. अशीच एक हायकू रचना कवयित्री अरुणा दुद्दलवार यांची व्हाटसऍपवर वाचायला मिळाली. हायकू रचना पुढील प्रमाणे

 

– तटस्थ –

 

“पक्षी एकला”

“निष्पर्ण फांदीवर”

“योगी भासला…..II”

 

अरूणा दुद्दलवार

९७६५९३४०२५

 

तटस्थ या हायकूमध्ये कवयित्री यांनी मानवी जीवनाचा शेवट काय होतो याचं अत्यंत अर्थपूर्ण वर्णन केले आहे. या हायकूचे थोडक्यात रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे.

*”पक्षी एकला”* – मनुष्य जन्माला येताना एकटाच येत असतो, जोवर त्याला समज येत नाही तोवर त्याची काळजी आईवडील घेत असतात मात्र त्यापुढच्या प्रवासात त्याला स्वतःलाच चालावे लागते. जे काही निर्णय घ्यायचे असतील , मग ते योग्य असो वा अयोग्य ते स्वतःलाच घ्यावे लागतात, आणि त्याचे फळही त्यालाच भोगावे लागतात. त्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. आपण मनुष्य देह धारण केला आहे म्हणून समाजात त्याला स्वतःचं वलय निर्माण करावं लागतं. ही एकट्याचीच धडपड असते. कुटुंब , समाज आणि सभोवतालची परिस्थिती त्याला फक्त आदेश करत असते, मार्ग दाखवत असते, मात्र प्रयत्न हे एकट्यालाच करावे लागतात. या पृथ्वीच्या परिवलन कक्षेत जो मानवी देह धारण करून जीवन जगत आहे त्याला हायकूकार त्याला “पक्षी एकला” म्हणतात.

*”निष्पर्ण फांदीवर”* – टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी मानव नेहमी प्रयत्नशील असतो, मात्र मानवाने कितीही कष्ट केले तरी त्याचे समाधान होत नाही, सतत प्रयत्नशील राहूनही म्हणावं तसे फळ मिळत नाही, कधी कधी त्यांचे कष्ट निष्फळ ठरतात. त्याचं जीवनच मुळात निष्पर्ण झालेल्या वृक्षासारखं असतं. कितीही कष्टाचं पाणी घाला, सुखाची पालवी लागतच नाही. आयुष्यभर माणूस सुखाच्या शोधात फिरत असतो. मात्र हे सुख निष्पर्ण फांदीसारखे असते, कधी सुखाची पाने गळून पडतील आणि फक्त हाडाची काडं (निष्पर्ण फांदी) दिसू लागतील ते सांगता येत नाही. मानवी देह हा इतका पळूनही त्याचे पळणे निष्प्रभ आहे, निष्फळ आहे, कितीही पळाला तरी शेवटी नदीवर जाणेच आहे म्हणून हायकूकार म्हणतात की हा मनुष्य प्राणी कितीही धडपडला तरी पण त्याचं जीवन हे निष्पर्ण फांदी सारखं आहे.

*”योगी भासला”* – मानवी जीवनाच्या काही अवस्था आहेत. जन्म झाल्यानंतर बाल्यावस्था, युवावस्था, वृद्धावस्था या अवस्थांतून जात असताना मनुष्याला गृहस्थाश्रमात फक्त कष्ट करावे, प्रपंच करावा आणि आपली उपजीविका करावी., संतती नियोजन करायचे, कष्ट करून संपत्ती जपायची, त्यानंतर मुलांचे लग्न करून द्यायचे आणि म्हातारपणात आता आपल्या हातून काहीच शारिरीक कष्ट होणार नाही, आपण प्रपंचात भार म्हणून गणले जाऊ अशावेळी वानप्रस्थाश्रमी जायचे म्हणजे आपलं शरीर, हा देह निसर्गाच्या स्वाधीन करायचा. माझ्या वाचनात असे आले आहे की, गरुड पक्षी वृद्धत्वाकडे झुकतो, आणि जेव्हा मरण जवळ येते तेव्हा गरुड पक्षी उंच अशा डोंगरावर एका सुरक्षित ठिकाणी एका गुहेत जाऊन बसतो आणि आपले शरीर निसर्गाच्या हवाली करून देतो, यावेळी गरुड पक्षी आपल्या शरीराचे निकामी झालेले पंख आधी चोचीने उपटून फेकून देतो, त्यानंतर आपली तीक्ष्ण चोंच खडकावर आपटून आपटून रक्तभंबाळ करतो आणि स्वतः मृत्यू स्वीकारतो. म्हणजेच गरुड पक्षी योगी होतो, त्याच्या कुटुंब कबिल्यापासून अलिप्त होतो, ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी साधू महात्मे संसार प्रपंच झाला की घरदार सोडून परमेश्वराच्या चिंतनात जंगलाचा मार्ग स्वीकारून अरण्यात आपली उपजीविका करून हा देह निसर्गाला अर्पण करीत होते. म्हणजेच वैराग्य धारण करायचे. योगी, त्याप्रमाणे साधू होऊन उर्वरित आयुष्य हे निसर्गाच्या सान्निध्यात काढावे, प्रपंच, मोह माया यांचा त्याग करावा. हा खरा मानवी जीवनाचा शेवट आहे. पक्षी एकला जेव्हा निष्पर्ण फांदीवरचे आयुष्य जगून वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हा त्याने योगीत्व, साधुत्व स्वीकारावे असा गर्भित अर्थ या हायकूमधून मला जाणवला आहे आणि हायकूकाराने नेमका हाच अर्थ यातून सुचित केला असावा.

मानवी जीवनाचा शेवट हा वैराग्य प्राप्त करूनच करावा. त्याने आयुष्याच्या शेवटी योगी पदाला जाऊन निसर्गाच्या, सृष्टीच्या उपयोगात यावे हा मानवी जीवनाचा अर्थ आहे.

अत्यंत सुंदर अर्थपूर्ण हायकू मा अरूणाताई दुद्दलवार यांनी मांडला आहे, त्यांना पुढील दर्जेदार लिखाणासाठी भरभरून शुभेच्छा.

रसग्रहण – प्रशांत वाघ “(पॅसिफिक टायगर)”

संपर्क – ७७७३९२५००० (“तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार”)

प्रतिक्रिया व्यक्त करा