You are currently viewing प्रिय मित्र वृक्षा…

प्रिय मित्र वृक्षा…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा लेख

प्रिय मित्र वृक्षा…

सप्रेम नमस्कार .. वि वि ..

“हिरवे हिरवेगार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे”

मित्रा , अगदी बालवयातच शाळेतच तुझा परिचय झाला रे !
तसे तुला जन्मापासूनच ओळखतो आम्ही..! पण पुस्तकी
ओळख म्हणतात ना ती मात्र शाळेच्या पुस्तकातूनच झाली.
ती कशी ? मूळ खोड पान फुल .. अशी.
मित्रा, तू किती महत्वाचा आहेस? हे काय कुणी सांगायला हवे? घरा समोरच्या झाडावर काऊ चिऊ येऊन बसताच काय
आनंद व्हायचा मला? आणि तुझ्या अंगाखांद्यावर वावरतांना
ते ही किती खुष ! नाचतात काय, उड्या काय मारतात, गुलूगुलू
गोष्टी काय करतात, आणि हे सारे दारात बसून पाहतांना, तेव्हाही आणि आता ही एक खंत आहे रे मित्रा मनात.. देवाने
त्यांच्या सारखे पंख का नाही दिले मला ?

 

खरे सांगतो मित्रा.. मला जर असे पंख मिळाले असते तर…
मी ही रात्रंदिवस तुझ्या कुशीतच विसावले असते इतका तू
मला प्रिय आहे.तुझा तो डौलदार पर्णपिसारा, हिरवाकंच रंग,
त्यातल्या विविध छटा, तुझ्या अंगावर उमलणारी ऋतुनुसार
डोलणारी सुमने,आणि हळू हळू होणारी फल धारणा पाहून
तर…! मन चक्राऊन जाते नि दरवर्षी घडणाऱ्या या चमत्कारामुळे नतमस्तकही होते. केवढा सृजनशील आहेस तू?
आणि तुझे देणे..? ते ही अफाट आणि अपरंपार..तुलनाच
होऊ शकत नाही त्याची कशाशी ? तुझ्या सारखा तूच!
केवळ अनुपमेय!

 

थकलेला वाटसरू जेव्हा तुझ्या पर्णछायेत विसावतो तेव्हा
तुझ्या त्या हिरव्या गारेगार सावलीत स्वर्ग गवसल्याचा त्याला
आनंद होतो. पाच मिनिटे डोळे मिटताच त्याचा थकवा पार निघून जातो नि मग तो पुन्हा मार्गस्थ होतो. मित्रा, ही सेवा काही तू आठ पंधरा दिवस नाही करत तू ? तर वर्षानुवर्षे,
बिनतक्रार तू हे काम करतो. तुझ्या सेवेला तोडच नाही राजा .!
आमच्या जीवनात सर्वांगाने भरून राहिला आहेस तू राजा.
पाने.. तुझी. फुले..तुझी .फळे..तुझी,सावली..तुझी,लाकडे..
तुझी,पाळणा..तुझा, घराला छप्पर..? तुझेच.बघ कसा सर्वांगाने व्यापले आहे तू आम्हाला? तुझ्या शिवाय आमचे
अस्तित्व…? छे..छे.. कल्पनाही करवत नाही रे. शिवाय तू
अत्यंत औषधी नि गुणकारी ही आहेस. हजारो औषधातून तू
थेट आमच्या पोटात जातो.

 

असे म्हणावेसे वाटते , तू नाहीस कुठे ? आमचे घर दार व
आम्ही यांना तुझेच कोंदण आहे म्हणूनच वसुंधरा एव्हढी
सुंदर आहे. अरे, तू काही घेत ही नाही की मागत ही नाही.
तुझे औदार्य अफाट आहे. तुझा कण आणि कण आम्ही
वापरतो.अगदी राख सुद्धा..! किती लिहू मित्रा, शब्द ही
कमी पडावेत असे तुझे वागणे आहे . मला तर नेहमी वाटते
देवा, पुन्हा जन्म असेल तर.. मला झाडच होऊ दे व जनतेची
सेवा करण्याची संधी दे.स्थितप्रज्ञता हा गुण शिकायचा असेल
तर तो तुझ्याकडूनच घ्यायला हवा इतका तू निर्लेप आहेस.

 

पाणी घाला न घाला, घाव घाला .. तरी तू तितक्याच मायेने
फळे व सावली देतोस.तुझ्या शिवाय हे कुणालाही शक्य नाही.
तुझे गुणगाण करायला मला रात्र ही पुरणार नाही. म्हणूनच
थांबते आता .खरे तर किती लिहू नि कुठे थांबू ? असे झाले
आहे मला…!

तुझी आणखी एक कमालीची गोष्ट सांगायची राहिलीच बघ.
अरे, आयुष्यभर तू साथ देतोसच पण शेवटी ही तू आम्हाला अंतर देत नाहीस .. थेट सरणावर झोपतोस नि आमच्या साठी
चटके सोसत अंगाची राख करून घेतोस .. कमाल आहेस, कमाल आहेस बाबा तू ….कमाल आहेस ….

तुझीच …

स्नेहांकित …

सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १६ मार्च २०२२
वेळ : सकाळी ११

प्रतिक्रिया व्यक्त करा