You are currently viewing गर्जा महाराष्ट्र माझा

गर्जा महाराष्ट्र माझा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका नंदिनी चांदवले लिखित अप्रतिम लेख*

 

*गर्जा महाराष्ट्र माझा*

 

27 फेब्रुवारी हा दिवस *मराठी राजभाषा दिन* म्हणून आपण साजरा करत असतो. विशेष म्हणजे साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे आवडते लेखक, कवी वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी दिन साजरा करतो..

स्वातंत्र्यलढा चालू असताना समाजामध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी अनेक पोवाडे , स्फूर्ती गीते, देशभक्तीपर गीते लिहिली गेली. गायली गेली. उदाहरणार्थ केशवसुतांची

*एक तुतारी द्या मज आणुनी*

*फुकिन मी जी स्वप्राणाने*

*भेदूनि टाकीन सगळी गगने*

*दीर्घ जिच्या त्या किंकाळीने*

*अशी तुतारी द्या मजलागुनी*

ही कविता. त्यामुळे समाजात स्वातंत्र्यलढ्यासाठी पुरती जागृती निर्माण झाली. असेच आणखी एक गीत, *’गर्जा महाराष्ट्र माझा’* या गीताने अवघा महाराष्ट्र चैतन्यमय झाला.

सुप्रसिद्ध कवी राजा बढे यांच्या गीताला श्रीनिवास खळे यानी संगीत दिले आहे ते म्हणजे *गर्जा महाराष्ट्र माझा*

 

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा॥ ध्रु॥

रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी ….

एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी

भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा

जय जय….

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभूराजा

दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय ………

काळ्या छातीवरी कोरलीअभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला,

निढळाच्या घामाने भिजला,

देश गौरवासाठी झिजला.

दिल्लीचेही तक्ख्त राखीतो महाराष्ट्र माझा !

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा !

कवी राजा बढे यांच्या लेखणीतून

उतरलेल्या सुंदर गीताने अवघा महाराष्ट्र मोहरला.चैतन्यमयी झाला.

विशेष म्हणजे हे सुंदर गीत शाहीर साबळे यांनी गोड आणि खड्या आवाजात गायले आहे.अशी अनेक गाणी शाहीरानी गायली आहेत ती अतिशय प्रसिद्ध झाली आहेत.

2023 साली शाहीर साबळे यांची जन्मशताब्दी साजरी झाली याच काळात या गीताला *महाराष्ट्राचे राज्यगीत* हा दर्जा मिळाला हा योगायोगच आहे.

कवी राजा बढे हे या गीतामध्ये महाराष्ट्रातील नद्यांचा गौरव पूर्ण उल्लेख करून समाजातील एकी दाखवून देतात.ते म्हणतात एकपणाचे पाणी भरती मातीच्या घागरी. तर भीमा नदीच्या काठी असणाऱ्या घोड्यांना यमुनेचे पाणी पाजा. आपले राज्य यमुने पर्यंत वाढले पाहिजे असा जणू संकेत देतात. गडगडणाऱ्या अस्मानाच्या सुलतानीला महाराष्ट्र जबाब देतो आणि शिवशंभू राजाचा नाद महाराष्ट्रभर घुमवतो. उन्हात शिजणारा, घामाने भिजणारा, गौरवासाठी झिजणारा असा हा आपला महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तावरही अधिकार गाजवतो. असे हे गौरव गीत मनाला भिडून जाते.

शाळेत असताना ताला- सुरात हे गाणे म्हटले. आजही ते ऐकताना मनात एक प्रकारचा जोश निर्माण होतो हेच या गाण्याचे यश आहे.

 

नंदिनी चांदवले

पुणे विभाग.

प्रतिक्रिया व्यक्त करा