You are currently viewing राणेंचा अडीच लाखांनी पराभावाचे विरोधकांचे स्वप्न स्वप्नच राहणार – खासदार अशोक नेते

राणेंचा अडीच लाखांनी पराभावाचे विरोधकांचे स्वप्न स्वप्नच राहणार – खासदार अशोक नेते

कणकवली :

भाजप पक्ष हा विकासाचे राजकारण करतो तर विरोधक हे मतांचे राजकारण करतात, असा आरोप करतानाच रत्नागिरी सिंधुदुर्गसहीत राज्यातील ४० हून अधिक जागा आम्ही जिंकू, असा विश्वास भाजपच्या एसटी मोर्चा विभागाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी केला. कणकवली येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भाजपच्या एसटी मोर्चा विभागाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजप हा समाजातील सर्व घटकांनासोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आदिवासी, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांना सोबत घेवून चालतो. आणि म्हणूनच देशाच्या सर्वाच्चप असलेल्या राष्ट्रपतीपदी ए. पी. जे.अब्दूल कलाम ,रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू यांना विराजमान केले. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न काँग्रेसने खितपत ठेवला होता. मात्र, महाराष्ट्रात देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक उभारण्याचा प्रश्न मार्गी लावला. आदिवासीचे दैवत बिरसा मुंडा यांचा जन्म दिवस १५ नोव्हेंबर हा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि त्‍यांच्या मित्रपक्षांच्या आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने टीका केली जात आहे. मात्र गेल्‍या दहा वर्षात मोदींनी विकास कामे करून या सर्व टीकेला प्रत्‍युत्तर दिले आहे. एवढेच नव्हे तर गेल्‍या चाळीस वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते मोदींनी करून दाखवले आहे. गेले दहा वर्षे भाजप बहुमतात आहे. आम्‍हा ला संविधान बदलायचं असतं किंवा राखीव जागांचं आरक्षण कमी करायचं असतं तर ते काम आम्‍ही केव्हाच केलं असतं. पण आम्‍ही संविधानाचे पाईक आहोत. तसेच राखीव जागांनाही धक्‍का लागू देणार नाही.

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा गेल्‍या दोन दिवसांत मी आढावा घेतला. यात भाजपयुतीचे उमेदवार नारायण राणे हे मोठ्या मताधिक्‍यांनी विजयी होतील अशी मला खात्री आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेससह घटक पक्षांना पराभव दिसू लागला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. यामुळेच त्यांनी विकासाचे मुद्दे सोडून जाती जातीत भांडणे लावण्याचे काम सुरू केले आहे. राणेंचा अडीच लाखांनी पराभव करू असे स्वप्न विरोधक पाहत आहेत. मात्र त्‍यांचे ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असा विश्‍वासही नेते यांनी व्यक्‍त केला.

यावेळी भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव कोहाळे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, आरपीआयचे आठवले गटाचे प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम, भाजपच्या एससी-एसटीचे सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, रुपेश राऊत, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, तालुकाप्रमुख भूषण परूळेकर, सुनील पारकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा