You are currently viewing दुःखाची जात निराळी

दुःखाची जात निराळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती रायबागकर*

*दुःखाची जात निराळी*

तिथी-आषाढ शुक्ल द्वादशी….
स्थळ – पंढरपूर

अरे रे रे रे…विठ्ठला, पांडुरंगा…
ऐकतोस का रे बाबा…अरे! काय हे…श्शी…मला तर एवढं अस्वच्छ, अमंगळ, अपवित्र वाटतंय आज…काय सांगू तुला…पण मी कुठे जाऊ स्वच्छ होण्यासाठी…काल सर्व वारकरी माझ्यात स्नान करून स्वच्छ, पवित्र झाले…मुखात अखंड तुझेच नाम घेऊन…

पांडुरंग विठ्ठल, जय हरी विठ्ठल

सुखावून गेले होते मीही क्षणभर…त्यांच्या आवाजात माझाही क्षीण आवाज मिसळण्याचा प्रयत्न केला मी…पण कसचं काय…किती उच्चरवात नामघोष चालला होता सगळ्या भक्तांचा…आणि त्याच लयीत चाललेली लगबग रांगेत उभी राहण्याची…सगळ्यांना आस एकच, तुझ्या दर्शनाची…थोडावेळ मीही गेले होते भांबावून…वाटलं, आपणही यावं का दर्शनाला तुझ्या…पण मग स्वतःच स्वतःची घातली समजूत…आपल्यासारखे भाग्यवान आपणच…आपल्याला तर वर्षभर…नव्हे, जन्मभरच सहवास आहे तुझा…आपल्या या वाहत्या निर्मळ जळातून तुझाच तर उद्घोष ऐकू येतोय…
आणि मग वाहता वाहता ऐकत राहिले…

ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय…

पण बा विठ्ठला…! माझी आजची दशा बघितलीस? परवापर्यंत निर्मळ, नितळ असलेली मी…आज मलाच बघवत नाहीये माझं हे घाणेरडं, मलीन रूप…आणि माझ्या काठावरची ती असह्य दुर्गंधी…तुला वाहिलेल्या लक्ष लक्ष मोगऱ्याच्या सुवासावरही मात करणारी…जिकडेतिकडे पसरलेलं ते घाणीचं साम्राज्य…नाही, ते सगळं स्वच्छ करायला आलीत ती माणसं…करतीलही स्वच्छ सगळा परिसर…पण देवा! तीही माणसंच आहेत ना…इतरांसारखीच पंचेंद्रिय असलेली…स्पर्श, रस, गंध ह्यांची जाणीव असलेली…ऐकू येतोय मला त्यांचा तो रागीट स्वर…त्यांचं ते बोलणं…ओव्या नव्हे…तर….

कबूल आहे…सगळे वारकरी घरादाराचे व्याप मागे सोडून…तुझ्या भजन कीर्तनात दंग होऊन…तुझ्या दर्शनाच्या ओढीने येतात पंढरीत…त्यांच्या शिस्तीचे, भक्तीचे, खूप कौतुक होते जगात…आणि खरंही आहे ते…भक्तिरसात दंग होणारे ते टाळ-मृदुंगाचे बोल, भान हरपून टाकणारे ते अश्व रिंगण, ती वाखाणण्यासारखी शिस्त, तो भेदाभेद अमंगळ मानणं…आपला संसार विसरून बायाबापड्यांचंही वारीत सामील होणं…आणि दिवसेंदिवस त्याची तरुणाईला आणि शहरवासियांनाही पडणारी भूल आणि म्हणूनच त्यात पडणारी भर…सगळं सगळं काही कौतुकास्पदच…

पण पंढरीनाथा…वारीपुरतंच असावं कारे हे सगळं…ही मनाची निर्मळता पुन्हा आपापल्या ठिकाणी गेल्यावर का न रहावी बरं तशीच…पुढच्या वारीपर्यंत…का सुरू व्हावे पुन्हा मतभेद, मनभेद? मला माहिती आहे, तीही माणसंच आहेत सगळे षड्रिपु सोबत बाळगणारी…कोणी संत-महात्मे नव्हेत…पण…ते असू दे…त्याबद्दल पुन्हा केव्हातरी…

आज तरी बोलायचंय मला इथल्या अस्वच्छतेबद्दलच…भक्तीरंगात आकंठ बुडालेले हे वैष्णवजन…वारी पुरते तरी का होईना समान मानतात सगळ्यांना…मन स्वच्छ, निर्मळ असतं त्यांचं तेव्हा…पण देहधर्म कुणाला चुकलाय बरं…या शरीराच्या स्वच्छतेसाठी वारीच्या मुक्कामाची ठिकाणं, तिथली भूमी का अस्वच्छ करायची! अरे, पूर्वीचं एक ठीक होतं…तेव्हा सोयीसुविधा कमी होत्या…शिवाय वारकरी म्हणजे शेतकरी कष्टकरी जमात…शेतीची पेरणीची हातघाई आटोपून पीक कापणीला येईपर्यंत चा मधला पाऊस काळ म्हणजे सणावारांचा, उत्सवाचा, तुझ्या नामात दंग होण्याचा काळ…म्हणून तर संतांनी ही वारीची प्रथा सुरू केली असावी…

पण तेव्हा वारकरीही खेड्यातलेच आणि वारीचा मार्गही खेड्यातलाच…त्यामुळे सगळ्यांच्याच सवयी एकसारख्या…कोणालाच, कशाचंच काहीही न वाटण्याच्या…पण आता काळ बदललाय बाबा…खेडी लुप्त होण्याच्या स्थितीत, त्यामुळे वारीचा मार्गही बऱ्याचदा शहरातूनच…म्हणजे पूर्वाश्रमीच्या खेड्यातूनच…मग वारकऱ्यांच्या स्थानी तुझी मूर्ती कल्पुन त्यांची सेवा केली तरी दुसऱ्या दिवशी मात्र नक्को ती वारी असे होऊन जात असते सेवेकर्‍यांना…वारीची सुरूवात झाली की पोहोचतो ना माझ्यापर्यंत तक्रारीचा सूर टाळचिपळ्यांच्या आवाजातुन वाट काढत…मला सावध करायलाच जणू…पण मी जरा दूर्लक्षच केले आजवर…म्हटलं, ह्या सत् सुरात आपला बदसुर नको…बरं, तेथे वारकरी संख्येने तरी कमी असतात…पण म्हणून काय झालं…त्रास तर होणारच…
आणि येथे पंढरपुरात तर…अबबब! …वारकऱ्यांचा महासागरच उसळलेला…मग तर बोलायलाच नको…पण नाही बोललं तर कळणार तरी कसं? जाणीव तरी कशी होणार…म्हणून ठरवलं…आज आपणच बोलायचं…तुझ्या कानावर गाऱ्हाणं घालायचंच…म्हणजे तू त्यांना सद्बुद्धी तरी देशील याबाबतीत …आणि पुढच्या वर्षी तरी…जरा उलटी गंगा वाहू दे…

जैसे स्वच्छ मन | तैसीच जमीन
नये करू घाण | दुज्यांसाठी ||

तुम्हालागी तेही | राबतात सक्त
असती ते भक्त | विठ्ठलाचे

 

आज इतकंच पुरे…शहाण्याला शब्दांचा मार…

पण तू ऐकतोयस ना रे सावळ्या…की मीच आपली बोल बोल बोलतेय…तू कसला ऐकतोयस् म्हणा…तुझ्या कानात अजूनही घुमत असणार तो टाळ-मृदंगाच्या साथीने चाललेला तुझा जयघोष…त्या कल्लोळात तुझ्या चंद्रभागेचा आवाज कसा बरं पोहोचणार तुझ्यापर्यंत…तोही तुझ्या कौतुकाचा, भक्तीभावाचा नव्हे तर तक्रारीचा सूर…हं…

सखे रखुमाई…आता तुलाच विनवते गं बाई…तो तर काही त्याच्या तंद्रीतून येणार नाही बाहेर…आणि जागाही सोडणार नाही आपली विटेवरची…आणि मलाही माझी सीमा ओलांडता येणार नाही…तेव्हा तूच जरा दोन पावलं पुढे येशील आणि घालशील का त्याच्या कानावर तो आपल्यात आल्यावर…शेवटी स्वच्छतेची आणि स्रियांची सांगड तर पूर्वापार चालून आलेली…त्यामुळे आपल्या दुःखाची जातच निराळी…खरं ना…तेव्हा सांगशील ना त्याला माझं दुःख आणि म्हणावं याची जाणीव होऊ दे वारकऱ्यांच्या मनाला
म्हणजेच ठरेल सर्वार्थाने…

वैष्णवांचा मेळा, आनंद सोहळा

*यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा* *हेतू नाही. फक्त* *जनजागृती व्हावी हाच उद्देश आहे. तरीही…* *क्षमस्व.*🙏

भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =