You are currently viewing सावरकर का नको?
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

सावरकर का नको?

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत सांबरे यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेला अप्रतिम लेख

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते . या व्यक्तीने हजारो लोकांना प्रेरित केले व कित्येकांना सर्वोच्च त्याग करण्यासाठी उद्युक्त केले .
ब्रिटिश सरकार वीर सावरकरांना आपले सर्वात मोठे व बुद्धिमान शत्रू समजत .आजही ब्रिटिशांनी सावरकर लंडन मध्ये जेथे राहत त्या घराच्या बाहेर लिहून ठेवले आहे , ” Vinayak Damodar Savarkar , The Great Indian Patriot And Philosopher Lived Here ” , म्हणजे ही अशी पाटी तिथे लावण्यात आज ब्रिटिशांना ही गर्व वाटत आहे .

( लंडन मधील इंडिया हाऊस , जेथे सावरकर राहिले होते )

गाय आलड्रेड हे ब्रिटिश पत्रकार म्हणतात की , ” सावरकर हे महान द्रष्टे आणी मानवतावादी नेते आहेत ” .

 

ठाकूर चंदनसिंग हे नेपाळ मधील गुरखा समाजाचे मोठे नेते जेव्हा सावरकरांना प्रत्यक्ष रत्नागिरीत भेटले व त्यांचे भाषण ऐकले तेव्हा म्हणाले , ” नेपोलियन कसा असेल याची आता मला कल्पना आली !” .

सरसेनापती करिअप्पा – मद्रास ( आत्ताचे चेन्नई ) येथील भाषणात म्हणाले होते , ” तरुण वयापासूनच सावरकरांनी सैनिकी प्रशिक्षणावर भर दिला होता .आपल्या देशाने सावरकरांचे वेळीच ऐकले असते तर हे चीन युद्धाचे संकट आपल्यावर कोसळले नसते ”

26 फेब्रुवारी 1975 रोजी
फिल्ड मार्शल सॅम माणकेशा पुण्यात सारस बागेजवळ पुतळ्याचे अनावरण करताना म्हणाले , ” मला आयुष्यात अनेक सन्मान मिळाले पण वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मान सैनिक म्हणून मिळाला तो मी कधीच विसरणे शक्य नाही ” .

इंदिरा गांधी सावरकर जन्मशताब्दी जवळ आली असता एका पत्रात म्हणतात , ” In her letter dated May 20, 1980, Indira Gandhi wrote, “Veer Savarkar’s daring defiance of the British Government has its own importance in the annals of our Freedom movement. I wish success to the plans to celebrate the birth centenary of the Veer Savarkar ”

अनेक त्यावेळची युरोपियन वृत्तपत्रे सावरकरांचे भरभरून कौतुक करत !
असे असताना खुद्द सावरकरांचा जो स्वदेश म्हणजे भारत येथे काय परिस्थिती आहे ?

येथे त्यांची विविध प्रकारे चेष्टा केली जाते .त्यांनी केलेल्या कार्यास दुर्लक्ष केले जाते . त्यांच्यावर नको नको ते आरोप केले जातात .

असे का झाले असावे ? आपण जे स्वातंत्र्य मिळाले आहे व ज्यांच्यामुळे मिळाले त्यांनाच विकृत का दाखवीत आहोत ? की यात काही विशिष्ट गटांचा फायदा आहे , म्हणून ते करत असतील का ?
की सावरकरांची ब्रिटिशांना जशी भीती वाटायची तशीच भीती या देशद्रोही गटांना वाटतेय का ?

 

मग अशावेळी आपण सर्वांनी फक्त बघतच राहायचे का ? काहीच नाही का करायचे ?

तर त्रिवार नाही , आपण पुढे होऊन जे योग्य व सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचविणे हे व्रत स्वीकारायला हवे .

सावरकर महान देशभक्त असूनही त्यांना सतत का नाकारले गेले वा त्यांच्या विचारांना का डावलले गेले त्याचा
आम्ही अभ्यास करताना जी मुख्य पाच कारणे वाटली ती क्रमशः आपण बघू 👇👇

या कारणांचा उहापोह करू व त्यावरील उपायांची चर्चा ही करूया 🙏

 

कारण पाहिले

सावरकर प्रखर हिंदुसंघटक होते

सावरकर स्वतः जातीभेद पाळणारे नसूनही त्यांच्यावर , ” जातीयवादी ” हा ठपका सातत्याने का बसला होता ? त्याला दोन कारणे होती . सावरकर हे ‘ एक माणूस एक मत ‘ या न्यायतत्वाचा हिरिरीने पुरस्कार करत हे एक कारण . मुसलमान मौलवी व ख्रिश्चन मिशनरी हे निरक्षर , अडाणी , गरीब हिंदूंना बाटवून आपल्या कळपात ओढतात , याला सावरकर प्रखर विरोध करत असत , हे दुसरे कारण . सावरकरांच्या या प्रचारामुळे जातीयवादी मुसलमान व ख्रिश्चन त्यांच्यावर दातओठ खात असत . हिंदूंवर केवढा ही ढळढळीत अन्याय झाला तरी आपण मोठे सहिष्णू आहोत हे दाखविणारे लोकही सावरकरांच्या प्रचाराने चिडत (संदर्भ – स्वातंत्र्यवीर सावरकर- धनंजय कीर , पृ- ६९८ ) .

हे कारण अतिशय महत्त्वाचे आहे .कारण जसजसे सावरकर विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचतील तसतसे या हिंदू समाजात फूट पाडणे अशक्य होईल हे ओळखून च बाहेरील व आतील देशद्रोही शक्ती सावरकर द्वेष पसरविणे हा मुख्य उद्देशाने काम करतात .
त्याचवेळी स्वतःला पुरोगामी व सर्वधर्म समभाव असे मानणारे पण ढोंगी लोकही हे ओळखतात की सावरकर जितके लोकांना समजतील तितके त्यांचे ढोंग लोकांपुढे येईल व त्यांचे पितळ उघडे पडेल त्यामुळे ही तथाकथित पुरोगामी जमात ही सावरकरांचा विरोध करते .

कारण दुसरे

बुद्धिप्रामाण्यवादी सावरकर

सावरकर हे खरे बुद्धिप्रामाण्यवादी होते . त्यांच्या विचारांत कुठलेही ढोंग व दुटप्पीपणा नसे . ते जसे हिंदुमधील अंधश्रद्धा व जातीयता यावर प्रहार करत तितकाच प्रहार मुस्लिम , ख्रिश्चन , व इतर धर्मातील दोषांवर ही करत . त्यामुळे आजकाल ज्या लोकांना फक्त हिंदूंवर टीका करून स्वतःचे स्वार्थ साधून घ्यायचे आहेत , त्या लोकांची ‘ सावरकर विचार ‘ जितके पुढे येतील तितकी त्यांची अडचण वाढत जाते .
मग हेच ढोंगी लोक सावरकरांच्या विचारांना बुद्धिभेद करून लोकांपुढे मांडतात . सावरकर म्हणत की गाईचे पूजन न करता तिचे योग्य प्रकारे पालन केले पाहिजे . यात सावरकरांनी गोमांस खाल्ले पाहिजे असे कुठेही म्हटले नसूनही हे ढोंगी लोक तसा खोटा प्रचार करतात . हे एक उदाहरण आहे , असे बरेच उद्योग या लोकांचे सुरू असतात .आपण या सर्वांपासून अखंड सावधान राहायला हवे .

कारण तिसरे

अखंड भारताचे पुरस्कर्ते

जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळत होते , तेव्हा खूप आधी ब्रिटिशांनी जी विभाजनाची बीजे पेरली होती त्याचा खूप मोठा वृक्ष होऊन त्याला विषारी फळे लागली होती . त्यातूनच पुढे भारताची फाळणी होऊन त्याचे तुकडे झाले . त्यावेळी व त्यापूर्वी ही सावरकरांनी अखंड भारताचा पुरस्कार केला होता . पण हे स्वप्न काही पुर्ण होऊ शकले नाही . तरीही पुढे जाऊन ही हे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होईल अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता .
आज आपल्या देशात अनेक देशद्रोही शक्ती वास करत आहेत . त्यातले काही तर उघडपणे , ” भारत तेरे तुकडे होंगे ! ” असे नारे देतात व आपल्या देशात भाषण स्वातंत्र्य चा गैरफायदा घेतला जातोय . अशावेळी जेव्हढे जास्त सावरकर विचार लोकांपर्यंत पोहोचतील तेवढी समाजात एकी वाढेल व अशा देशद्रोही शक्तींचे ( या शक्तींना परदेशातून आपल्या शत्रू कडून ही फंडिंग मिळते ) पितळ उघडे पडेल . कारण सावरकर या वृत्तींना , ‘ जशास तसे ‘ उत्तर द्यावे असे सांगतात . तसेच सावरकर वाचले व समजले तर , ‘ देशभक्ती ‘ व , ‘ देशद्रोह ‘ या व्याख्या तर्कशुद्ध रीतीने उलगडत जातात .

हेच कारण आहे सावरकर विराधाचे , आणि या देशद्रोही वृत्ती पुढे ही विचारांना विरोध करतच राहणार हे गृहीत धरून तयार राहावे लागेल .

कारण चौथे

हिंदुत्वाची नव्याने मांडणी व नवी व्याख्या

हिंदुत्व हा शब्द सावरकरांच्या पूर्वी ही काही लोकांनी वापरला असला तरी त्याची सुटसुटीत व सर्वसमावेशक व्याख्या फक्त सावरकरांनीच केली . ती अशी –

आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका |

पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ||

म्हणजेच पवित्र सिंधू नदीपासून ते सिंधुसागरापर्यंत ( दक्षिण समुद्र ) असलेल्या या भरतभूला जो आपली पितृभूमी व पुण्यभूमी मानतो तो प्रत्येकजण हिंदू होय .
अर्थात ही व्याख्या त्यांनी फक्त हिंदू या शब्दाची केली आहे .त्यांचा यामागचा उद्देश अखिल हिंदू जगताने ( हिंदू , शीख , जैन, बौद्ध , आदिवासी इ ) या हिंदुत्वाच्या ध्वजाखाली एकत्र यावे हा होता . यात कुठेही असे म्हटलेले नाही की दुसऱ्या कुठल्या धर्माला तुच्छ लेखावे वा दूर करावे . किंवा सावरकर कुठेही असे म्हणत नाही जो मनुष्य या व्याख्येत बसत नाही ( हिंदुत्वाच्या ) तर तो देशभक्त वा भारतीय नसेल . पण काही अर्धवट लोक पूर्णपणे माहिती न घेता विनाकारण सावरकरांना बदनाम करत राहतात .

बाकी यातही हिंदूंचे एकीकरण व संघटिकरंण होऊ नये यासाठी प्रयत्न करणारे लोकही सावरकरांवर नाराज असतील यात काय शंका ? कारण जसजशी सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या समस्त हिंदू जनास समजत जाईल तसतसे या बाहेरील शक्तींचे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे मनसुबे उध्वस्त जातील .
आपण एकच करायचे सावरकर विचार विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवीत राहायचे .

कारण पाचवे

खरी व निस्पृह देशभक्ती

आपण रोज जगताना अनेक आदर्श आपल्यासमोर येतात वा निर्माण केले जातात . आजचे बरेच नेते ,आपण बघतो की जे देशाचा विचार करण्याऐवजी स्वतःचा विचार करून अगणित संपत्ती गोळा करतात . तरीही ते लोकांसमोर असा भास निर्माण करतात की आपणच खरे देशभक्त आहोत .
पण त्याचवेळी सावरकर चरित्र जेव्हा आपल्यासमोर ठेवले जाते वा सांगितले जाते तेव्हा लक्षात येते की ,

१ . सावरकर यांनी नेहमीच लोकप्रियतेपेक्षा लोकहीत वा देशहित महत्वाचे मानले .
२ .त्यांनी कधीही वैयक्तिक संपत्ती गोळा केली नाही वा आपल्या मुलांना कुठलाही फायदा करून दिला नाही .
३ .त्यांनी आयुष्यभर फक्त देशहिताचाच विचार केला .

हेच कारण आहे की स्वातंत्र्यानंतर सावरकर विचारांना मुद्दाम दुर्लक्षित केले गेले व आजही तसेच प्रयत्न होताना दिसतात .

कारण खरी देशभक्ती काय असते हे सावरकर चरित्र अभ्यासताना समजू लागते , मग त्याचवेळी भ्रष्टाचारी व चरित्रहीन नेत्यांचे खरे रूप जनतेला समजू लागते .
यात एक मुद्दा असाही आहे जो माझ्या या लेखमालेतील पहिल्या लेखात ही सांगितलं होता , तो असा की स्वातंत्र्यानंतर काँग्रेस ने म गांधीजी यांच्या नावाचा फक्त वापर केला पण गांधीजीचा साधेपणा व प्रामाणिकपणा या गुणांना मात्र सतत डावलले . हे असे गुण होते की जे म गांधीजी यांना वाटायचे की सार्वजनिक जीवनात भारतीय नेत्यांनी पाळायलाच पाहिजे .

याशिवाय ही अजून कारणे असतील , पण जी काही ठळक कारणे मला वाटली ती मी आपणापुढे ठेवली आहेत .

( स्वा सावरकर – कीर लिखित सावरकर )

असे उत्तुंग चरित्र असलेल्या नेत्यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीपुढे ठेवावा हा या लेखमालेचा उद्देश होता .
या लेखमालेतील सर्वच लेखनास जो भरभरून प्रतिसाद वाचकांनी दिला , त्याबद्दल आभार 🙏

हेमंत सांबरे
9922992370 .
(आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्कीच आवडेल , आपण फोन , sms वा ई-मेल करून नक्की कळवा )

प्रतिक्रिया व्यक्त करा