*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
*आषाढी अमावस्या*
आली आषाढी आवस
दीप पुजन घेऊन
घरदार प्रकाशले
लख:प्रकाश लेवुन
होई पुजा घरोघरी
दिवे लागले देव्हारी
आषाढीची अमावस्या
मुखी नाम हरी हरी
रंग रंगांची रांगोळी
रेखाटली देवापुढे
गोड नैवेद्य ठेवता
आराधना देवाकडे
रोषणाई उजळली
दिवा दिव्याला जोडती
उजळल्या पणतीच्या
लक्ष लक्ष दिपज्योती
दीप लागता ज्ञानाचा
लख्ख प्रकाश पडतो
नांदे सुख शांती सदा
अंधःकार दूर जातो
तेजोमय प्रकाशाने
घरदार उजळले
सुरु होई चातुर्मास
श्रावणाचे घन निळे
करु स्वागत आनंदे
श्रावण महिन्याचे
सण वार येती घरा
दिस सुख सोहळ्याचे
*शीला पाटील. चांदवड.*
