फोंडाघाट बाजारपेठेत भरधाव कंटेनरमुळे चार वीजजोडण्या खंडित; अजित नाडकर्णी आक्रमक
चेकपोस्टवर मद्यपान करून वाहन चालविण्याची तपासणी करण्याची मागणी; ५ डिसेंबरनंतर आंदोलनाचा इशारा
फोंडाघाट : प्रतिनिधी
फोंडाघाट बाजारपेठेतून भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरमुळे चार वीजजोडण्या तुटल्याची घटना घडली आहे. बाजारपेठेतून अवजड वाहने अत्यंत वेगाने जात असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल करत अजित नाडकर्णी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
फोंडाघाट बाजारपेठेतून जाणाऱ्या कंटेनर आणि अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. चेकपोस्टवर या वाहनचालकांची मद्यपान करून वाहन चालवित आहेत का, याची नियमित तपासणी करावी, अशी मागणी नाडकर्णी यांनी केली आहे. यासंदर्भात आज चेकपोस्टवर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या समस्येवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास ५ डिसेंबरनंतर जोरदार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचेही लक्ष वेधण्यात येणार आहे.
फोंडाघाट बाजारपेठेतून अवजड कंटेनरची वाहतूक सुरू ठेवण्याऐवजी या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून करूळ घाट किंवा बायपासचा विचार करावा. या कंटेनर वाहतुकीचा स्थानिक व्यापाऱ्यांना कोणताही विशेष फायदा होत नसताना बाजारपेठेतील नागरिकांना मात्र वाहतुकीचा धोका सहन करावा लागत आहे, ही दुर्दैवी बाब असल्याचे अजित नाडकर्णी यांनी म्हटले आहे.
आता तरी प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
