You are currently viewing मोहर…

मोहर…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच,….लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा ललीतलेख…

खरंच….! किती सुंदर वाटत होतं ते उन्हात पावसाचं खेळणं…पावसाच्या त्या थेंबांमधूनही पाझरत होते इंद्रधनुचे सप्तरंग…मोहून टाकत होते मनाला…. हिऱ्यांसारखे चमकणारे पानांवरचे पावसाचे थेंब…अलगद सांडत होते सौंदर्यातील एक एक हिरा पानांच्या टोकांवरून धरणीवर…..रुजवत होते नवा जीव भूमातेच्या गर्भातून….उमलून बहरण्यासाठी….जसं नवतरुणीने यौवनात यावे…..सजलेल्या मांडवात गोऱ्या अंगावर नाजूक हातांनी…..हळद लागावी…हळदीच्या अंगाने तिने लाजत…मुरडत गालावर खळी पाडून गालातल्या गालात हसावे…शरमेने लाले लाल व्हावे…जसा फुललेला गुलाब शरमेने लाल गुलाबी होतो तशीच भासायची ती ऊन पावसाच्या मिलनातली सोनेरी…चंदेरी सकाळ.
ऋतू बदलत गेला….पहाटेच्या अंधुक प्रकाशात शुभ्रधवल धुकं आपलं बस्तान मांडू लागलं….हवेसोबत गिरक्या घेऊ लागलं…जणू पिंजलेला कापूस वाऱ्यासोबत मुक्तपणे सैर करतो तसाच भास होऊ लागला…आपल्या नाजूक…हळुवार स्पर्शाने धुकंही वाऱ्याच्या तालावर डुलणाऱ्या गवताच्या पातींवर बाष्प होऊन विसावू लागलं….गवताच्या पातींना चंदेरी रूप येऊ लागलं…चंदेरी रुपात गवताच्या पाती जणू चांदीने मढविल्या तशाच चंदेरी चादर लपेटून वाऱ्यावर डुलु लागल्या…

*हिरवे हिरवे गार गालिचे..*
*शाल चंदेरी नेसुनी आले….*
*शुभ्र धुक्यात रूप सृष्टीचे…*
*स्वर्गातूनही सुंदर दिसले…*

झाडा पानांवर दवबिंदूंचे तुषार कोवळ्या उन्हात चमकू लागले…पक्ष्यांच्या गाण्यांचे मंजुळ स्वर घुमू लागले…कोकिळेचा कुहू कुहू….टिटवीची टीव टीव….. मयुराचे केकारव….राघूची शीळ….कर्णपटलांवर अप्रतिम संगीत वाजू लागले….अन अंगाला झोंबणारा वारा गुलाबी थंडीची चाहूल देऊन जाताच….अंगावर रोमांच उभे राहिले….पहाटेचं धुकं केसांवर जमू लागलं….अंगात शिरशिरी येऊ लागली…..त्या गुलाबी थंडीत…..पहाटेला… कोवळ्या उन्हाची मिठीही उबदार वाटू लागली…..रजई मध्ये मिळणाऱ्या उबेसारखीच….झाडे…वेली आनंदून गेल्या….नुकत्याच लग्न झालेल्या नव्या नवरीला आपल्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याची…. आपल्या जीवाच्या जीवलगाची चाहुल लागावी…..अन…तिने त्याच कल्पनेने लाजावे…शहारावे… फुलून यावे तशीच….झाडेही फुलू लागली….आंब्याच्या…काजूच्या फांद्यांवर नवांकुर फुटावेत… तसाच मोहर फुलू लागला…मोहराने झाडांना व्यापून टाकले….पान अन पान… मोहराच्या सौंदर्या आड लपले….घरच्या आनंदी सोहळ्यात घराने नटावे….दारी तोरणे लावावीत….. विजेच्या माळांनी भिंती सजाव्यात…. आणि त्या रंगबिरंगी विजेच्या दिव्यांच्या प्रकाशात…घरदार…छप्पर… अगदी दारासमोरच्या अंगणातील शोभेच्या झाडांनी रंगबिरंगी वस्त्र लेवून….नटावे…सजावे… तशीच झाडे पानापानात मोहरली…बहरली…अन फुललेल्या मोहराचा दरवळ रानीवनी पसरला….अत्तराचा गंधही तिथे फिका पडला….

*रानीवनी पसरला मंद*
*दरवळ मोहोराचा,,,*
*न्हाऊ घालून गेला*
*तुषार दवबिंदूंचा…*

झाडांवरच्या मोहराला….न्हाऊ घालून गेले…पहाटेचे….दवबिंदूंचे तुषार….
चिमणा…चिमणी…..भुंगे..फुलपाखरे… प्राशन करती रस मधुर….
मिलन पुंकेसराचं झालं….
अन…जन्मास कणीदार बाळ आलं….
रानीवनी पसरला दरवळ…तृप्त झाली घानेंद्रिये….
फळांचा रस जिभेवर यावा…ती चव जिभेने चाखावी….आणि… तृप्त होऊन जावं….तसाच मोहराचा गंध तृप्त करून जातो अनंत जिव्हा……आसुसलेल्या…. आम्ररसाशी जिभेच्या मिलनासाठी…!

©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 5 =