सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नसबंदी न झाल्यास पालिकेविरोधात न्यायालयात जाणार – राजू मसुरकर
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप; जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा
सावंतवाडी :
शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृद्ध महिला, लहान मुले तसेच नागरिकांना भटक्या कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटना वारंवार घडत असून अशा अनेक जखमी नागरिकांना रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागत असल्याचा दावा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केला आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येमुळे देशातील एका जागरूक नागरिकाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शासनाला भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र, या आदेशाची सावंतवाडी नगरपालिकेकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असा आरोप मसुरकर यांनी केला आहे.
यासंदर्भात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी आपण सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेकडून लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात येईल. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून नगरपालिकेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही राजू मसुरकर यांनी दिला आहे.
