जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न
सिंधुदुर्गनगरी
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठ्यात खंड पडू नये तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने आवश्यक दक्षता घ्यावी, रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे व फांद्यांची छाटणी मान्सूनपूर्व कालावधीत तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तृप्ती धोडमिसे यांच्या निर्देशानुसार सचिव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्ग तथा जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्या उपस्थितीत परिषदेची बैठक 25 मे रोजी पार पडली.
या बैठकीस जिल्ह्यातील अशासकीय सदस्य सर्वश्री. दयानंद चौधरी, अॅड. नकुल पार्सेकर, प्रा. सुरेश पाटील, आनंद मेस्त्री, महेश संसारे, विष्णूप्रसाद दळवी, संदेश तुळसणकर, तेजस साळुंखे, हे उपस्थित होते. काही अशासकीय सदस्य प्रा. सुभाष गोवेकर व विलास कुबल V.C व्दारे बैठकीस उपस्थित होते. अनेक विभागाचे शासकीय सदस्य या बैठकीस प्रत्यक्ष तसेच V.C व्दारे उपस्थित होते. प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्वसामान्य ग्राहकांशी निगडित असलेल्या विविध विभागांच्या सेवा व समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत अशासकीय सदस्यांनी एस.टी. महामंडळ, महावितरण (MSEB), आरोग्य विभाग, बी.एस.एन.एल (BSNL) जीओ. एअरटेल आणि विविध कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क या संदर्भातील तक्रारी व विषय मांडले त्यावर श्री. सहारे यांनी संबंधित अशासकीय सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर तातडीने अंमलबजावणी करुन समााधान करण्याचे आदेश दिले.
वैभववाडी बसस्थानकामध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेत एक नियंत्रक असतो परंतु रात्रपाळीसाठी एक उपनियंत्रक दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा. तसेच जिल्ह्यातील सर्वच बसस्थानके स्वच्छ ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या. कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना विहित वेळेत बि बियाणे पुरवठा करण्याबाबत कृषि विभागास या बैठकीत सूचना देण्यात आल्या.
