You are currently viewing मुकीचं पोर…

मुकीचं पोर…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य पत्रकार लेखक कवी सागर बाणदार यांचा जीवनातील सत्य कथन करणारा भावस्पर्शी लेख

हे गं मुकीचं पोर…होय,लहान असताना पाहिलं होतं…आता खूप मोठं झालंय… अशीच खूपदा माझी ओळख माझ्या परिचयाच्या लोकांना पटवून द्यायची असते आणि समोरच्याला ती पटतही असते…मग् मी कसा लहानाचा मोठा झालो,याचं तेच कथन करत राहतात… यामध्ये मी आणि माझं अस्तित्व याचा कुठेतरी मीच संबंध जोडत राहतो…वडील वारल्यानंतर मी महिन्याने जन्मलो आणि त्यानंतर पूर्णतः मुकी असलेल्या आईनं माझा थोरला भाऊ व मी अशा आम्हा दोघा भावंडांचा माहेरी राहूनच सांभाळ केला… यात कर्तव्य कमी अन् तडजोडच जास्त होती… कारण परावलंबित्व म्हणजे पंख झाटूनही जगण्यासाठी आभाळात झेप घेत राहणं असतं…आई आम्हाला कुठेही घेवून गेली की,ही मुकीची पोरं…असं म्हणूनच नातेवाईक किंवा परिचयाचे लोक पोकळ आधाराचा विश्वास द्यायचे…काहीतर आता या पोरांचं कसं व्हायचं म्हणून चिंता व्यक्त करायचे…हे अनुभवताना माझ्या काळजात काहीकाळ धस्स व्हायचं…अन् आपण खरंच जगण्याच्या योग्यतेचे नाही का ? असा प्रश्न मनाला सैरभर करुन सोडायचा…हे असं दिवसामागून दिवस सरत असतानाच अवतीभवती चाललेलं प्रत्येक घरातलं जगणं ,मी डोळ्यांनी पहात मनात साठवून ठेवायचो…काही घरात आई -वडील आणि त्यांची मुलं सुखा -समाधानात जगताना पाहून, आपण का याला पोरके झालो,याच प्रश्नाचं मनातील काहूर थैमान घालत रहायचं… आई मुकी असल्यानं ती हातवारे करुन प्रेमाच्या स्पर्शातून बोलत अन् समजावत रहायची …तिचा तो स्पर्श मला आशेनं जगण्याचा बळ देत रहायचा…काहींजण मुकीची पोरं,म्हणून आमचा खूप हेवाही करायची…तेच काहींना नाही पटायचं…तेच आमच्याबद्दल काहीतरी उलटसुलट सांंगून आमची जितकी जास्त बदनामी होईल, तितकी करुन आसुरी आनंद मिळवायचे…हे सारंं मला लहान असूनही कळत होतं, पण तरीही
काहीच करु शकत नव्हतो…नेमकी हीच हतबलता आमच्या दु:खात भर घालणारी होती… जसं आमचं वय वाढू लागलं,तसं आईच्या डोळ्यात सुखाची, आनंदाची स्वप्ने तरळत राहिली… हे मी तिच्या
चेह-यावरील आनंद पाहून समजून जायचो…दिवसामागून दिवस सरत असतानाच मी दहावीत असताना आईला आजारपणानं गाठलं…ती बरी होईल म्हणून सांगलीच्या सरकारी दवाखान्यात दहा -पंधरा दिवस मुक्काम ठोकून तिच्यावर उपचार केले…पण,ती यातून नाही सुटू शकली आणि अखेर मरणानं तिला गाठलंच…याच काळात दवाखान्यातील एक नर्स मावशी माझी व भावाची आईला वाचवण्यासाठी चाललेली धडपड पहात होती…त्या स्वभावाने खूप कडक आणि शिस्तप्रिय होत्या…रुममध्ये पेशंटला पाहण्यासाठी नातेवाईकांना ठरलेल्या वेळेतच सोडायच्या… पण,आम्हाला मात्र यासाठी त्यांनी पूर्णतः मुभा दिली होती…त्यांच्याही चेहऱ्यावर आमच्यासाठी काळजी दिसायची… अन्. त्या वारंवार आम्हाला जवळ घेवून मायेचा आधार देत धीर द्यायच्या… बाळांनो,नका काळजी करु ,तुमची आई पूर्ण बरी होईल, असे समजावून सांगताना त्यांचेही डोळे भरुन यायचे…आईवरील उपचारासाठी बाहेरुन सतत महागडी औषधे आणायला लागायची… याशिवाय सलाईनदेखील बाहेरुनच मागवायला लागायचे… हे सारं त्या नर्स मावशींना माहित होतं…त्यांनी मला जवळ बोलावून आपल्या अधिकारातील काही सलाईनच्या बाटल्या माझ्याकडे दिल्या, आणि ज्यावेळी याची आवश्यकता भासेल, तेव्हा त्या वापरा,असे सांगितले…हे सारं त्यांनी कोणत्याही अपेक्षेविना केलं होतं…खरंतर मलाच त्यांच्यामध्ये आता माझी आई दिसत होती… ड्युटी संपत आली की,त्या आईजवळ येवून तिची आस्थेने चौकशी करायच्या…आम्हा दोघा भावंडांना जवळ घेवून तिला ,तुला तुझ्या मुलांसाठी लवकर बरं व्हायचंय म्हणायच्या…हे सारं आई डोळ्यानं पहात मानेनं हो…म्हणत रहायची…तेव्हा माझ्या मनातल्या भावनांचा बांध फुटत रहायचा…मग् पुन्हा मनानं सावरत आई लवकर बरी व्हावी म्हणून वाटेल ती खटपट करत रहायचो…जेव्हा आईनं हे जग सोडलं…तेंव्हा कोसळलेला दु:खाचा डोंगर काही केल्या सावरता येत नव्हता… या घटनेनंतर दोन – चार दिवसातच टेलिफोनवर काँल आला…तर समोरची व्यक्ती म्हणजे ही दुसरी तिसरी कोणीच नव्हती, तर ती होती सरकारी दवाखान्यातील त्या नर्स मावशी… त्यांच्याशी मी बोलताना त्यादेखील खूपच भावनाविवश झाल्या होत्या… मला म्हणाल्या, बाळ आता सावर स्वतः ला…तुम्ही दोघा लेकरांनी आईची खूप सेवा केली… त्या जिवंत असत्या तर आणखी सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं होतं…आता दु:ख करत बसू नका…आयुष्यात चांगलं वागून आई -बाबाचं नांव मोठं करा,असं म्हणतच त्यांचाही हुंदका फुटला…त्या काही वेळ नि:शब्द झाल्या होत्या… त्याचवेळी मला वाटलं की,आईनंच माझी मुलं कशी आहेत, जरा लक्ष ठेव,असं सांगून त्यांना आमच्याकडे पाठवलंय… त्या टेलिफोनवर खूप वेळ बोलत असतानाच अचानक फोन कट झाला… आणि त्या फोनची मी आजही आतूरतेने वाट पाहतोय…. पण,त्यांना मी आता नक्कीच भेटून या प्रेमाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार आहे… त्यांना खूपदा शोधलंही दवाखान्यात, सांगली शहरात… पण,त्यांचा कुठेच पत्ता सापडत नाही…पण,तो शोधल्याशिवाय माझ्या मनाला चैनच नाही
मिळणार, हेही तितकंच खरं आहे…आई -वडीलांच्या पश्चात जगणं हे संघर्षमय असलं तरीही ते जोडलेल्या जीवाभावाच्या नात्यातील मायेच्या आधारानं सुसह्य होत राहिलंय… जगाच्या या शाळेत अनुभवांनी स्वतः ला अधिक सम्रुध्द करतानाच आपणही या समाजाचे काहीतरी देणे लागतो,या जाणीवेतूनच आपल्या परीने शक्य तेवढे विधायक कार्य करत राहण्याचा प्रवास अविरतपणे सुरु ठेवलाय…त्यामुळे आता मुकीचं पोर म्हणून मिरवताना मलाही स्वतः ला अभिमान वाटत राहतो…आणि हेच जगणं इतरांनाही कळावं,म्हणूनच लेख, कविता आणि चारोळीच्या माध्यमातून शब्दप्रपंच थाटून त्यातूनच शाश्वत जगण्याचा मार्ग शोधत चालत राहिलोय…
नियतीचा डाव असेलही क्रूर
म्हणून नाही हरलो मनानं ,
चढ -उतारांची वाट चालताना
घडतच राहिलो अनुभवाच्या क्षणानं !
……………………………………………………………
– सागर बाणदार
मु.पो. इचलकरंजी…….

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − three =