You are currently viewing कुडाळात काँग्रेसबरोबर जाण्याचे निश्चित, परंतू नगराध्यक्ष पदाचा निर्णय वरिष्ठ घेणार – अरूण दुधवडकर

कुडाळात काँग्रेसबरोबर जाण्याचे निश्चित, परंतू नगराध्यक्ष पदाचा निर्णय वरिष्ठ घेणार – अरूण दुधवडकर

आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीत शिवसेनेचे विशेष लक्ष…

सावंतवाडी

कुडाळ नगर पंचायतीमध्ये शिवसेनेने काँग्रेस बरोबर जाण्याचे निश्चित केले आहे. मात्र नगराध्यक्ष कोणाकडे याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज येथे दिली. दरम्यान दोडामार्ग येथे काही धुसफुस असल्याने पक्षाला नुकसान नको, म्हणून कार्यकारणीत फेरबदल होणार आहेत. येत्या दहा तारखेपर्यंत याबाबतची अधिकृत घोषणा होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. श्री. दुधवडकर हे आज या ठिकाणी आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
ते म्हणाले, कुडाळ नगरपंचायतीत नगराध्यक्ष बसवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी काँग्रेस बरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. परंतु नगराध्यक्ष पद कोणी घ्यावे, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. त्यामुळे याबाबत आपण अधिक काही सांगू शकत नाही. तर पक्षात गटात असावेत परंतु पक्षापेक्षा कोणी मोठा नसावा, असे आमचे म्हणणे आहे. त्या संदर्भात आवश्यक असलेल्या सूचना आज येथे झालेल्या बैठकीत आम्ही उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका शिवसेना लढवणार आहे. त्या दृष्टीने पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार तयारी सुरू आहे, असेही दुधवडकर म्हणाले.
यावेळी शब्बीर मणियार, सागर नाणोसकर, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, योगेश नाईक, अशोक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा