You are currently viewing शाळा महाविद्यालये बंद…मुलांचे भवितव्य अंधारात..

शाळा महाविद्यालये बंद…मुलांचे भवितव्य अंधारात..

मागास, भटक्या समाजातील मुले प्रवाहापासून दुरावण्याची भीती

संपादकीय….

ओमायक्रॉन व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा दि. ६ जाने २०२२ पासून बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी दिला. कोव्हीड या आजाराचा सर्वात जास्त परिणाम कशावर झाला असेल तर तो शैक्षणिक व्यवस्थेवर .
गेली दोन वर्ष कोव्हीडमुळे शाळा बंद होत्या. या दोन वर्षाच्या काळात मुले पुढच्या इयत्तेत जरी गेलेली असली तरी त्यांची गुणवत्ता मात्र दोन वर्षांनी घसरली आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सुशिक्षीत पालकांची मुले सोडली तर इतर सर्व मुले अभ्यासात खूप मागे गेलेली दिसून येतात. आपल्या कोकणचा पट्टा हा डोंगराळ आहे. खेडेगावांनी व्यापला आहे. काही अशी खेडी आहेत जिथे शिक्षणाच्या पुरेशा सुविधाही उपलब्ध नाहीत. मुलांचे पालक गरीब, अशिक्षीत आहेत. काहींचे पालक तर व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत. पालकांना शिक्षणाविषयी अनास्था आहे. अशा डोंगराळ, जंगलमय भागात जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत. त्या शाळेवर व तिथे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांवर या गरीब मुलांचे भविष्य अवलंबून आहे. काही मुलांची आर्थिक परिस्थिती इतकी दयनीय आहे की त्यांच्या घरी दोन वेळची चूलही पेटू शकत नाही. अशा घरांतील या मुलांना शाळेत दुपारी मध्यान्ह भोजन पोटभर पोषण आहार मिळत होता. सर्वशिक्षा अभियाना अंतर्गत मिळणारी मोफत पाठयपुस्तके, मोफत गणवेश या सरकारी सुविधांमुळे या मुलांचे शिक्षण व्यवस्थित होत होते. भटक्या विमुक्त कातकरी समाजातील मुले आज शिक्षणाकडे आणली गेली होती, ऑनलाईन शिक्षण पद्धतीत अशी मुले शैक्षणिक प्रवाहापासून दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकवेळ पोटभर मिळणारं अन्न आणि मोफत शिक्षण यामुळेच ही मुले शाळेकडे आकर्षित झाली होती, एकदा का अभ्यासातील रुची कमी झाली तर ही मुले आई बापाप्रमाणेच जंगलात आपल्या अन्नाच्या शोधार्थ भटकतील, परिणामी सर्वांना शिक्षण देण्याच्या योजनेलाच खीळ बसेल.
शाळांमध्ये शिकवणारा शिक्षक हाच त्या मुलांचा गुरू, मार्गदर्शक, आई, बाप या सर्व भूमिका पार पाडत असतो. मुलांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ते शिक्षक सरकार व व्यवस्थापन समितीच्या सहाय्याने विविध प्रकारचे उपक्रम शाळेत राबवतात. सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज प्रत्येक खेड्यापाड्यातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. आपली मुले वाचतात, लिहितात, शाळेत त्यांच्यावर चांगले संस्कार केले जातात. हे पाहून अलीकडच्या काळात पालकही खूष होते. आपली मुले सुशिक्षित , सुसंस्कारीत झाली पाहिजेत या आशेने पालक ६ वर्षे पूर्ण होताच शाळेत दाखल करत होते. त्यातील एखाद्या विद्यार्थ्यांने कला, क्रिडा किंवा अभ्यासात यश संपादन करून शिष्यवृत्ती मिळवली तर शिक्षक पालकच नव्हे तर सर्वच स्तरावरून त्याचे कौतुक होते. त्यातून त्या मुला बरोबर इतर मुलांनाही प्रेरणा मिळते. पण मागच्या दोन वर्षात जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना या महाभयंकर राक्षसामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था कोलमडून पडली आहे. शिकण्यासाठी आवश्यक असणारी बौद्धीक पात्रता, आवड अजूनही शाळा बंद व पुरेशा मार्गदर्शना अभावी त्यांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे.
खेडोपाडी डोंगराळ भागात राहणारी ही गरीब मुले ऑनलाईन शिक्षण कसे घेतील? जिथे दोन वेळचे अन्न मिळताना मुश्कील. तिथे या मुलाना १० ते १५ हजारांचा मोबाईल कोण घेऊन देणार? एखाद्या मजूरी करणाऱ्या पालकांनी पोटाला चिमटा काढून मोबाईल घेतलाही तरी त्याचे रिचार्ज त्यांना परवडेल का? तसेच खेडोपाडी नेटवर्क ही सुद्धा फार मोठी समस्या आहे.
अशा अवस्थेत शिक्षक या विद्यार्थ्याना अध्यापन करू शकत नाहीत. हे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीत. भारताच्या या भावी नागरिकांचे भविष्य अंधारातच नाही का? कशी घडतील ही अनमोल रत्ने !

आणखी काही वर्ष जर ही स्थिती अशीच राहीली तर …..
विद्यार्थ्यांजवळ कदाचित डिगऱ्या असतील. पण खरे ज्ञान ?……

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =