You are currently viewing परभणी येथे होणार पहिले अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

परभणी येथे होणार पहिले अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

*परभणी येथे होणार पहिले अखिल भारतीय मराठी गझल संमेलन*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मराठी गझल क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असणारी गझल मंथन साहित्य संस्था आणि गंगाखेड येथील मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठी गझलेचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून तसेच मराठी साहित्याने, साहित्य जाणिवेने, महाराष्ट्रातील साहित्य चळवळ समृद्ध व्हावी ह्या हेतूने दि. १३ व १४ मे २०२३ रोजी गंगाखेड शहरात दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी गझल संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
गझल मंथन साहित्य संस्था ही साहित्य चळवळीत कार्यरत असलेली संस्था असून संस्थेने आतापर्यंत, उस्मानाबाद (धाराशिव), शहादा, नंदुरबार, लातूर, धुळे, रत्नागिरी, जालना, चंद्रपुर, पुणे, पनवेल, ठाणे, जळगांव, मुंबई अशा विविध ठिकाणी, मराठी गझल मुशायरे, कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे, पुस्तक प्रकाशने आयोजित केलेली आहेत. याचसोबत गझलेचे ऑनलाईन मार्गदर्शन, गझलेला वाहिलेले फेसबुक पेज, युट्युब चॅनेलद्वारे गझल गायकांद्वारे गझलेला स्वरसाज देऊन गझल प्रसाराचे काम जोमाने पार पाडले जात आहे. यावेळी पहिल्यांदाच गझल मंथन संस्था आणि मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान हे संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय गझल संमेलन आयोजित करत आहेत, जिथे महाराष्ट्रातील नावाजलेल्या आणि गझल क्षेत्रातील दिग्गज साहित्यिकांचे विचार, गझल आणि मैफिल ऐकण्याची दुर्मिळ संधी रसिकांना उपलब्ध होत आहे.
ह्या दोन दिवसीय संमेलनात मराठी गझल संग्रह आणि काव्यसंग्रहांचे प्रकाशन, गझलेतील प्रतिष्ठेचा ‘ जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान सोहळा, निमंत्रितांचा गझल मुशायरा, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकाराची प्रकट मुलाखत, गझलेतील विविध ज्वलंत विषयांना अनुसरून आयोजित केलेला दिग्गज साहित्यिकांचा परिसंवाद, सुप्रसिद्ध गायक संकेत नागपुरकर यांच्या सुश्राव्य गझल गायनाची मैफिल त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध गझलकारांचे अनेक मुशायरे आदी कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी रसिकांची ज्ञानेंद्रिये तृप्त करणारी ठरणार आहेत.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे ह्या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटक तथा स्वागताध्यक्ष आहेत, संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गझलकार नितिन देशमुख (अमरावती) ह्यांची उपस्थिती राहणार आहेत. पुणे येथील सुप्रसिद्ध कवी व गझलकार प्रमोद खराडे हे ह्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. उद्घाटन समारंभाला सुप्रसिद्ध कवी तथा ज्येष्ठ गझलकार श्री. म. भा. चव्हाण ( पुणे), डॉ. ज्ञानेश पाटील (जळगांव) यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. संमेलनात महाराष्ट्रातील काही नामवंत निमंत्रित गझलकारांचा मुशायरा असणार आहे. यात प्रशांत वैद्य (ठाणे), अमोल शिरसाट (आकोला), दर्शन शहा (हैद्राबाद), प्रा. सिद्धार्थ भगत (यवतमाळ) यांचा सहभाग राहणार आहे.
संमेलनाला अनिल कांबळे – अध्यक्ष गझलमंथन साहित्य संस्था, वसुदेव गुमटकर – उपाध्यक्ष, जयवंत वानखडे – सचिव, उमा पाटील – सहसचिव, भरत माळी – प्रसिद्धी प्रमुख यांच्यासोबतच हनुमंत मुंढे – अध्यक्ष मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान, ॲड. मिलिंद क्षीरसागर- सचिव, हनुमंत लटपटे, राजेभाऊ बापू सातपुते – सदस्य या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संमेलन यशस्वी होण्यासाठी विविध समित्या गठित केलेल्या असून यशवंत मस्के हे संमेलन नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत कवी विठ्ठल सातपुते, आत्माराम जाधव, डॉ. अविनाश कासाडे, प्रा. दीनानाथ फुलवाडकर, रत्नाकर जोशी, आत्तम गेंदे, एम.एम. नागरगोजे, संजय तिडके, गणेश नरवटे, दिवाकर जोशी, महेश होनमाने, सिद्धेश्वर इंगोले, शिवशंकर डोईजड हे संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
संमेलनात महाराष्ट्रभरातील गझलकार, रसिक तथा साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत असून ह्या दोन दिवसीय संमेलनाला गझल मंथन साहित्य संस्थेचे मार्गदर्शक समिती सदस्य डॉ. कैलास गायकवाड, डॉ. शिवाजी काळे, निलेश कवडे, स्नेहल कुलकर्णी, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. राज रणधीर, शांताराम (शाम) खामकर, समीर बापट, उर्मिला बांदिवडेकर यांची उपस्थितीसुद्धा लाभणार आहे. गंगापूरकरांना प्रसिद्ध गायक संकेत नागपूरकर यांची गझल मैफिल अनुभवायला मिळणार आहे. साहित्यानुकूल सजलेले व्यासपीठ, सुसज्ज सभागृह, दोन दिवस भरगच्च आयोजिलेले कार्यक्रम आणि गझलमय ४८ तासांनी गंगाखेड नगरीची साहित्य चळवळ समृद्ध करणारा हा उपक्रम कुणीच चुकवू नये असा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा