You are currently viewing दीप स्तंभ

दीप स्तंभ

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

कधि पहाटेस एक दीप कळी उमलली
हळुच कशी कानी मज एक शब्द बोलली
क्षितिजावर तमरेषा सागरास बिलगली
ऊठ सख्या आज उभी दारी जणु दीपावली

अंतरात सहजी मग जागतात दीप शिखा
डोह दिसे स्वप्नांचा मंतरल्या सारखा
वारुळात प्रश्नांच्या दडला का जिव फुका
आज जुन्या जखमांची कातही टाकेल कां?

घाव सोसले अनेक माझ्याशी लढुन मीच
पुन्हा पुन्हा सांवरलो कधि हरलो मी उगिच
कधि प्रेमा न्याय दिला अन्याया झुगारून
मॆत्रिचि साद दिलि दोषांना स्विकारुन

माझे नव्हते कुणीच आज ही सारे तसेच
मी तरी माझा कुठे? प्रश्न जिवघेणे असेच
ज्योत एक ये उजळुन भ्रम सारे गेले जळून
हे विश्वचि माझे घर नकळत गेले कळून

ज्योतिने उजळुन ज्योत भरुदे हा आसमंत
पालवी फुटो, न उरो शुष्क क्षणांचिच खंत
जागणेच जगणे अन जगणे असो वसंत
दीपस्तंभ तुम्हि सारे अन् अंतरात सर्व संत

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा