You are currently viewing २६ जुलै रोजी बिळवस श्री देवी सातेरी जलमंदिरचा वार्षिक जत्रोत्सव

२६ जुलै रोजी बिळवस श्री देवी सातेरी जलमंदिरचा वार्षिक जत्रोत्सव

आषाढ महिन्यातील जिल्ह्यातील एकमेव वैशिष्ट्यपूर्ण जत्रोत्सव; हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा

मालवण / मसुरे :

निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या आणि कोकणच्या समृद्ध धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे गावची ‘मूळमाया’ म्हणून ओळख असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा वार्षिक जत्रोत्सव २६ जुलै २०२६ रोजी साजरा होत आहे. आषाढ महिन्यात कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये होणारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि एकमेव जत्रोत्सव असल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोकणात मान्सूनचे रौद्र आणि देखणे रूप अनुभवायला मिळत असतानाच हा जत्रोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या चहूबाजूंनी असलेले पाणी, हिरवाईने नटलेला परिसर आणि जलमंदिरात विराजमान झालेली सातेरी देवी हे दृश्य भाविकांना आध्यात्मिक समाधान देणारे ठरते. पावसाळ्यात होणारा हा एकमेव जत्रोत्सव असल्याने मुंबईतील चाकरमानी, गोव्यासह विविध राज्यांतील भक्त मोठ्या संख्येने बिळवस येथे दाखल होतात.

नवसाला पावणारी आणि संकटसमयी भक्तांच्या हाकेला धावून जाणारी देवी अशी श्री देवी सातेरीची ख्याती पंचक्रोशीतच नव्हे तर देश-विदेशात पसरलेली आहे. वर्षभरात केलेले नवस पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांचा जनसागर या दिवशी बिळवस येथे उसळत असतो.

जत्रोत्सवाच्या दिवशी २६ जुलै रोजी पहाटेपासूनच जलमंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मंत्रोच्चारात देवीचे विधीवत अभिषेक व पूजन करण्यात येईल. पूजनानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येणार असून सुवासिनींकडून देवीची खणानारळाने ओटी भरणे तसेच वर्षभरातील नवस फेडण्याचे धार्मिक विधी पार पडतील. दिवसभर चालणाऱ्या या भक्तिमय सोहळ्याची सांगता सायंकाळी पारंपरिक धार्मिक विधींनी होणार आहे.

जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बिळवस गावात उत्साहाचे वातावरण असून हजारो भाविकांच्या सोयीसाठी तयारीला सुरुवात करण्यात येणार आहे. श्री सातेरी देवालय ट्रस्ट आणि समस्त बिळवस ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांना या पवित्र आषाढोत्सवात सहभागी होऊन देवीचे दर्शन, ओटी भरणे व नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा