सावंतवाडीत विकास गेला सुट्टीवर, झडतात फक्त आरोप प्रत्यारोपाच्या फैरी.

सावंतवाडीत विकास गेला सुट्टीवर, झडतात फक्त आरोप प्रत्यारोपाच्या फैरी.

“उतावळा नवरा गुडग्याला बाशिंग” अशीच काहीशी परिस्थिती

विशेष संपादकीय…..

सावंतवाडी नगरपालिकेत सत्ता बदल होऊन नऊ महिने झाले, निवडणुकीत घोषणांचा पाऊस पाडला आणि गेल्या २३ वर्षात सावंतवाडीत इतर तालुक्यांच्या मानाने झालेला विकास विसरून शहरात बदल हवा, नवीन नेतृत्व नवे बदल घडवेल याच आशेवर त्याच त्याच चेहऱ्यांना, पक्षांना तिलांजली देत सावंतवाडीकर जनतेने नवीन नेता निवडून दिला आणि सावंतवाडी पालिकेत सत्ता बदल झाला.
पोटनिवडणुकीच्या वेळी आमदार नितेश राणे सावंतवाडी पालिकेची जबाबदारी स्वतःवर घेत संजू परब यांना निवडून द्या, सावंतवाडी शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो असे आश्वासन दिले होते. सावंतवाडीत भुयारी गटार, कंटेनर थिएटर, २४ तास मुबलक पाणी, प्रत्येक वाड्यात रस्ते, वीज अशा एक ना अनेक घोषणा केल्या होत्या. परंतु उतावळा नवरा गुडग्याला बाशिंग अशीच काहीशी परिस्थिती सावंतवाडी नगरपालिकेत पहायला मिळते आहे. कोरोनाच्या नावावर गेले कित्येक महिने सावंतवाडीत विकास हरवला आहे, तो शोधूनही सापडत नाही. संत गाडगेबाबा भाजी मंडईची जागा बिल्डर ला देऊन तिथे मॉल उभा करणे एवढाच काय तो उद्देश विकासाकडे जाताना दिसत आहे. भर पावसाळ्यात देखील २४ तास पाणी दिले जात नाही, आणि कंटेनरमधून फक्त अवैद्य दारू पकडल्याच्या बातम्या येतात, थिएटरचा पत्ताच नाही. भुयारी गटार हे तर भविष्यातही होतील याची शाश्वती नाही.
आपापसातील मतभेदांमुळे किंवा संजू परब हे राणे कुटुंबापासून दूर होत त्यांचा ओढा रवींद्र चव्हाण यांच्याकडे जास्त दिसू लागल्याने नितेश राणे यांनी तर सावंतवाडी नगरपालिकेकडे पाठच फिरवलेली दिसत आहे. त्यामुळे देवगड, वैभववाडी सारखा सावंतवाडीचा सुद्धा विकास होईल ही मात्र संकल्पनाच राहिली असून सावंतवाडीकर सुज्ञ जनतेस मात्र स्वतःहून केलेल्या चुकीची जाणीव व्हायला लागली आहे. त्यामुळे होता ता बरा होता असा सूर अनेकांच्या मुखातून ऐकू येत आहे.
जेष्ठ नगरसेविकेला एकवेळ आईचा दर्जा द्यायचा आणि दुसऱ्याच क्षणी ज्यांना आई म्हटलं त्यांच्यावर चिखलफेक करायची ही बापूसाहेबांच्या पुण्य भूमीतील शिकवण नव्हे. त्यामुळे उतावळेपणी घेतलेल्या एकतर्फी स्वहित जपणाऱ्या निर्णयांवर विरोधकांकडून टीका केली जाते व नवखे नगराध्यक्ष टीकेचे लक्ष होतात. त्याचवेळी पुन्हा पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष किंवा त्यांचे अननुभवी साथीदार विरोधकांवर टीका करतात असेच चित्र सावंतवाडी नगरपालिकेत गेले काही महिने दिसून येत आहे. विकासाच्या दिशेने कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसून विरोधात असताना सत्ताधाऱ्यांवर केलेले आरोप करणे किती सोपे असते याचाही प्रत्यय आताच्या सत्ताधाऱ्यांना आलेला दिसत आहे.
आरोप प्रत्यारोप करून आपण सावंतवाडी नगरपालिकेला प्रकाशझोतात नक्कीच ठेवत आहात, परंतु असं करण्याने सावंतवाडीकरांची सत्ताधारी दिशाभूल करून त्यांचा लक्ष वेगळीकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत हे सावंतवाडीच्या जनतेच्या नक्कीच ध्यानात येत आहे. विकासाच्या बाता करून मोठमोठ्या वल्गना करणाऱ्यांनी सावंतवाडीचा विकास कुठे हरवला याचा वेळ भेटलाच तर जरूर शोध घ्यावा अशी सर्वसामान्य सावंतवाडीकरांची अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा