You are currently viewing सावंतवाडीत महावितरणचे नक्की चाललंय काय?

सावंतवाडीत महावितरणचे नक्की चाललंय काय?

गेला आठवडाभर रात्रीचीच वीज गायब..

संपादकीय….

लॉकडाऊनच्या काळात भरमसाट वीज देयके देऊन ग्राहकांचे कंबरडे मोडणाऱ्या महावितरण कार्यालयाचे गेला आठवडाभर नक्की चाललंय काय? असा प्रश्न सावंतवाडीकरांना पडला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वत्र उद्योगधंदे बंद असताना, नोकऱ्या सोडून नागरिक घरातच बेकार असताना, दोन वेळच्या जेवणाचे सुद्धा हाल असताना महाराष्ट्र सरकारचे विज वीतरण मंडळ मात्र चक्रवाढ व्याज लावल्याप्रमाणे वीज युनिट लावून ग्राहकांना नाहक भरमसाट बिले देऊन लूट करत आहे. कित्येक ग्राहकांनी वीज बिल भरून देखील त्यांना पुन्हा पुन्हा वीजबिल देत नाहक त्रास देत आहे.
भरमसाट वीज बिल आकारणी करून देखील गेले आठ दिवस सावंतवाडीत संपूर्ण रात्री चार पाच वेळा तरी विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने सावंतवाडीकर नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे आणि अननुभवी कर्मचारी वर्गामुळे शहरवासीयांना रात्रीच्यावेळी त्रास होत आहे. कित्येक ठिकाणी पावसाळ्यात वाढलेली झाडी आणि वेली विद्युत वहिनींना गुंडाळलेल्या आहेत, त्या वेळेवर न छाटल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार दिसून येतात. उप अभियंता सावंतवाडी यांनी वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराची योग्यवेळी दखल घ्यावी आणि उपाययोजना करावी अशी सावंतवाडीकरांची मागणी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − twelve =