You are currently viewing दारूधंदेवाल्यांची नवी थीम….

दारूधंदेवाल्यांची नवी थीम….

आयटम पुढे बसवा, बिनधास्त दारू ओढा..

मिडियाचे स्ट्रिंग ऑपरेशन

संपादकीय…

दारूच्या अवैद्य व्यवसायात तरुणाई गुरफटत चालली आहे. गोव्यातून होणारी चोरटी दारू वाहतूक अलीकडे पकडली जाऊ लागली तसे या दारू व्यावसायिकांचे प्लॅन बदलू लागले. दारूच्या व्यवसायात ओढली गेलेली तरुणाई कशाप्रकारे वापरता येईल हे यांच्या सुपीक डोक्यात नेहमीच पिकत असतं. दारुतून मिळालेल्या बक्कळ पैशांच्या जादूवर भाळलेल्या पोरी दारूच्या धंद्यातून मिळालेल्या पैशांच्या जोरावर गाड्या घेऊन मौजमजा मारणाऱ्या तरुणांच्यावर फिदा होतात. याचाच फायदा घेत ही तरुणाई दारूची अवैद्य वाहतूक करताना आपली आयटम गाडीत पुढे बसवतात आणि बाकी गाडीत पूर्णपणे दारू भरतात. गोव्यातून चोरटी वाहतूक करताना गाडीत पुढे स्त्री असलेली पाहून शक्यतो तपासणी नाक्यांवर गाडी व्यवस्थित तपासली जात नाही. गाडीत महिला असल्याने नाक्यावरील कर्मचारी लाजतात, गाडीत आतमध्ये पाहत नाहीत. समोर बाई आहे म्हटल्यावर गाडी तपासायचीच राहून जाते. त्याचाच फायदा हे तरुण उठवतात आणि बिनधास्तपणे दारूची वाहतूक करतात.
राज्य उत्पादन शुल्क खात्याने मध्यंतरी काही छापे घातले, परंतु चार दिवसांच्या धाड सत्रानंतर मात्र कारवाई शांत झाली आणि पुन्हा एकदा दारूच्या सौदागरांनी आपली मोहीम नवी थीम वापरून सुरू केली. *ही नवी क्लुप्ती त्यांना कोणी सांगितली?* हा देखील एक संशयित प्रश्न आहे. आपल्याला जास्त तसदी नको म्हणून पकडणारयनीच तर ही क्लुप्ती दिली नसेल ना? असाही संशय बळावत आहे. तथाकथित सावंतवाडीतील नेते देखील या दारूच्या तस्करीत आघाडीवर आहेत. सावंतवाडीत सुरू झालेली अवैद्य दारुवरची कारवाई देखील अंतर्गत तडजोडीनंतर थंड पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सावंतवाडीत पुन्हा खुलेआम गोवा बनावटीची दारू मिळू लागली आहे.
दारूच्या व्यवसायात मिळालेल्या बक्कळ पैशांमधून तरुणाईने महागड्या गाड्या घेतल्या आहेत. शिल्पग्राम परिसरात रेस सिनेमाचे ट्रेलर रोज संध्याकाळी पहायला मिळते. आपली आयटम गाडीवर बसवून हे युवक भेफाम वेगात गाड्या चालवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. राजकीय लागेबांधे आणि दारुवाल्यांशी असलेल्या संबंधांमुळे कोणीही नागरिक तक्रार करत नाहीत, आणि केली तरी दारुवाल्यांचा फोन आला की त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्षच केला जातो. अशीच दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे मोठमोठे आवाज काढत भेफाम वेगात फिरणाऱ्या गाडीवाल्या युवकांची दहशत सावंतवाडीत वाढत चाललेली आहे. शिल्पग्राम परिसरात युवकांचा रोमान्स सुरू असतो, तिथे चारही दिशेला पळण्यासाठी वाटा असल्याने त्याचा गैरफायदा उठवत हे युवक धिंगाणा घालत असतात. मोती तलावाच्या काठावर पॉम्पस हॉटेलसमोर या युवकांचा अड्डा आहे, जोरजोरात ओरडत, धिंगाणा घालत हे युवक तिथे बसलेले असतात. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची दहशत वाढत चालली आहे.
सावंतवाडी पालिकेतील काही नगरसेवक देखील तरुणांच्या कृत्यांपुढे हतबल झाले आहेत. भविष्यात सावंतवाडी नगरपालिकेत दारू मटक्याची पार्श्वभूमी असलेलेच उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून गेले तर आश्चर्य वाटायला नको. मतदानाच्या वेळी सुशिक्षित नागरिक देखील अवैद्य व्यवसायातून आलेला पैसा वाटतात त्यांनाच मतदान करतात आणि स्वतःच्याच हाताने स्वतःच्या सुंदर शहराची वाट लावतात. सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांची असलेली सावंतवाडी गेली काही वर्षे दारू, मटके सारख्या अवैद्य धंदेवाल्यांची सावंतवाडी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. राजकीय पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढावे, परंतु अवैद्य व्यवसायात असलेल्या उमेदवाराकडे मात्र दुर्लक्ष करावे. सुसंस्कृत नागरिकांनी देखील अशा अवैद्य व्यवसायाशी निगडित उमेदवारांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. नाहीतर भविष्यात निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात न होता रक्तरंजित होतील. आणि सावंतवाडीच्या इतिहासाला गालबोट लागल्यास श्री पाटेकराची या भूमीत पाप करणाऱ्याला आणि पापिला मदत करणाऱ्यांना देखील देव पाटेकर माफ करणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =