You are currently viewing महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर घेणार शपथ…

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर घेणार शपथ…

संपादकीय….

महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एक मोठा गट बाहेर पडून 40 आमदारांनी भाजपच्या सहकार्याने नवीन युतीचे सरकार राज्यात अस्तित्वात आणले. महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि युतीचे सरकार अस्तित्वात आले परंतु केवळ मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस या दोघांचा शपथविधी पार पडला. इतर मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र रखडला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होत असून निवडक काहीच मंत्र्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. भाजपकडून तीन किंवा जास्तीत जास्त पाच मंत्री शपथ घेणार आहेत. यात प्रामुख्याने चंद्रकांतदादा पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाकडून चार मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून त्यामध्ये शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे आमदार गुलाबराव पाटील व शिंदे गटाचे मास्टरमाईंड आमदार दीपक केसरकर यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीमध्ये फूट पडून शिवसेनेचे 40 आमदार शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारमधून बाहेर पडलेल्या चाळीस आमदारांना पुन्हा येण्यासाठी भावनिक साथ घातली होती. परंतु हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत यापुढे जुळवून घेता येणार नाही, असे सांगत आमदार आपल्या मतावर ठाम राहिले. यावेळी शिंदे गटाची बाजू महाराष्ट्राच्या जनतेसमोर मीडियाच्या माध्यमातून मांडण्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. शांत संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे आमदार दीपक केसरकर यांनी जवळपास एक दशकाहून जास्त काळ विधिमंडळाच्या कामकाजात घालविला आहे व मागच्या युती सरकारमध्ये गृहराज्यमंत्री या महत्त्वाच्या पदावर काम केल्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचा कस लावत त्यांनी प्रवक्ते पदाची जबाबदारी लीलया पेलली होती. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून दीपक केसरकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. त्यांच्या अभ्यासूवृत्ती, अनुभवामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा एकदा सावंतवाडीतील सभ्य, सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून ओळख असणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आमदार दीपक केसरकर कॅबिनेट मंत्री बनणार याचा जिल्हावासीयांना सार्थ अभिमान आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 18 =