You are currently viewing केंद्राची रेडी – संकेश्वर महामार्गाऐवजी संकेश्वर -बांदा महामार्गाला मंजुरी..

केंद्राची रेडी – संकेश्वर महामार्गाऐवजी संकेश्वर -बांदा महामार्गाला मंजुरी..

जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या उपयोग होणार का??

विशेष संपादकीय….

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या नव्या महामार्गाची संकल्पना केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती. त्याप्रमाणे नव्या संकेश्वर ते रेडी अशा महामार्गाचे सर्वेक्षण देखील करण्यात आले होते. परंतु नव्या सर्वेक्षणात हा महामार्ग संकेश्वर वरून रेडी असा न जोडता महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या बांदा या गावाला जोडण्याचे निश्चित केले आहे.
केंद्राने संकेश्वर-रेडी ऐवजी संकेश्वर-बांदा या नव्या महामार्गाला मंजुरी दिलेली असून त्याचे नोटिफिकेशन सुद्धा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून काढण्यात आले आहे. हा महामार्ग १०३ किलोमीटरचा असेल. संकेश्वर येथून सुरू होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, माडखोल, सावंतवाडी, इन्सुली मार्गे बांदा येथे NH 66 ला जोडला जाणार आहे. या महामार्गाला NH 48 क्रमांक देण्यात आलेला आहे.
संकेश्वर वरून सुरू होणारा हा महामार्ग रेडी बंदराला जोडला गेला असता तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी, शिरोडा, वेळाघर, मोचेमाड, वेंगुर्ला आदी समुद्र किनाऱ्यांचा विकास झाला असता. वेळाघर येथे ताज ग्रुप चे पंचतारांकित हॉटेल उभे राहत आहे त्यामुळे भविष्यात पर्यटनदृष्ट्या या महामार्गामुळे जिल्हा विकासाच्या वाटेवर गेला असता. रेडी बंदरातून देशात विदेशात खनिज वाहतूक होते, तसेच कर्नाटक मध्येही खनिज वाहतूक केली जाते यासाठी हा महामार्ग उपयोगी आला असता. रेडी येथील प्रसिद्ध स्वयंभू गणेश मंदिर, लोहखनिजाच्या खाणी, वेंगुर्ला बंदर, स्वच्छ समुद्रकिनारे इत्यादींकडे चांगली वाहतूक सुविधा निर्माण झाल्याने पर्यटक आकर्षित झाले असते. परंतु संकेश्वर रेडी ऐवजी केंद्राने संकेश्वर बांदा महामार्गाला मंजुरी देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनदृष्ट्या होणाऱ्या विकासाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या बांदा नगरीतून NH 66 हा चौपदरी महामार्ग गोव्याला जात आहेत, तिथे दुसरा महामार्ग नेऊन जोडण्याचा केंद्राचा उद्देश स्पष्ट होत नाही, उलट सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या जमिनी अधिग्रहित करून गोवा राज्याच्या विकासाची जास्त काळजी केंद्र सरकारला असल्याचे दिसून येत आहे.
संकेश्वर वरून जाणारा हा मार्ग आंबोली, सावंतवाडीवरून इन्सुली मार्गे बांदा येथे NH 66 ला का जोडला जातो हे सुद्धा अनाकलनीय आहे. या मार्गाने NH 66 हा महामार्ग साधारणपणे ९ किलोमीटर लांब असून सावंतवाडी वरून मळगाव येथे NH 66 महामार्ग केवळ ३ किलोमीटर आहे. असे असताना जवळचा पर्याय न निवडता माजगाव, इन्सुली इत्यादी गावातील रस्त्यालगतच्या घरांना नुकसान पोचविण्याचे कारण काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्र सरकारने मजुरी दिलेल्या संकेश्वर बांदा महामार्गापेक्षा संकेश्वर रेडी महामार्ग होणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. जिल्ह्याच्या खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी निवेदन देऊन जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला संकेश्वर-रेडी महामार्ग बनविण्याच्या दृष्टीने विचार करण्यास भाग पाडणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्ह्यातील राजकीय नेते जिल्ह्याच्या महत्वाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतील का?

प्रतिक्रिया व्यक्त करा