You are currently viewing काखेत कळसा आणि गावाला वळसा…

काखेत कळसा आणि गावाला वळसा…

संपादकीय……..

सावंतवाडीच्या नगराध्यक्षांना उशिरा का होईना सावंतवाडीत गैरधंदे सुरू आहेत याची जाणीव झाली आहे. सावंतवाडीत आणि सिंधुदुर्गात सुरू असलेल्या अनधिकृत दारू वाहतूक, विक्री, मटका, जुगार अशा गैरधंद्यांबाबत मिडियामधून अनेकवेळा आवाज उठवले जातात. परंतु काही तथाकथित समाजसेवक, नेते मात्र मीडियाच्या नावाने ओरड मारून मीडियाला बदनाम करण्यास सुरुवात करतात. परंतु सावंतवाडीत गैरधंदे सुरू असल्याचे सावंतवाडीच्या नगराध्यक्षांनीच मान्य केल्याने मीडियाला बदनाम करणाऱ्यांच्या कानाखाली सणसणीत चपराक बसली आहे.
सावंतवाडी शहरात मागणी तिथे पुरवठा अशाप्रकारे दारूचा पुरवठा करणारी कितीतरी मुले आहेत जी बाटली मागे ५०/- रुपये जास्त घेऊन पुरवठा करतात. परंतु गोव्याची पुरवठा केली जाणारी अनधिकृत दारू मुळात सावंतवाडीत आणतं कोण? गैरधंदे कोण करतं? ते कुठल्या राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आहेत? याचाही तपास होणे अत्यंत गरजेचे आहे.
सावंतवाडी नगराध्यक्षांना सावंतवाडी शहरात दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने दारूचा महापूर आल्याचे जाणवले आहे. शहरात कित्येक युवक दारू विक्रीत अडकल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी हे प्रकार रोखावेत अन्यथा अधीक्षकांना दारूच्या बाटल्या कुरियरने पाठविण्याची नगराध्यक्ष संजू परब यांची घोषणा म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा अशीच परिस्थिती आहे. मांजराने जरी डोळे मिटून दूध पिलं तरी बघणाऱ्यांचे डोळे मात्र सताड उघडे असतात. ते मात्र दूध आणि मांजर कुणाचं हे बरोबर ओळखतात आणि जेव्हा गोंधळ घालायचा तेव्हा गोंधळ घालतातच.
मामाकी ऐनक माथेपर ती डोक्यावरून काढून डोळ्यावर जरी लावली तरी आपल्या अवतीभवतीचे सर्व साफ दिसू लागतं असं म्हटलं जातं. तसंच संजू परब यांनी आपल्या अवतीभवती पाहिल्यास कुरियर पाठविण्याची गरज भासणार नाही हे मात्र नक्की…

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − sixteen =