You are currently viewing मटक्याचे अर्थकारण….मटक्यातील गडगंज फायद्यामुळे नेते, लोकप्रतिनिधी सुद्धा मटक्याच्या धंद्यात

मटक्याचे अर्थकारण….मटक्यातील गडगंज फायद्यामुळे नेते, लोकप्रतिनिधी सुद्धा मटक्याच्या धंद्यात

संपादकीय……

सावंतवाडीत गेली कित्येकवर्षे मटका जोरदार सुरू आहे. मटक्यामुळे काही सर्वसामान्य लोक भिकेलाही लागले असतील, काही गोरगरीब छोटेमोठे व्यवहार करून रोजचा घरखर्च सुद्धा चालवत आहेत, काही तर फक्त मटक्याच्या जीवावरच जगत आहेत, मटका बंद तर उपासमार अशीही काहींची गत आहे. म्हणजे मटका काहींना फायद्याचा, काहींना तोट्याचा तर सरकारला कुचकामाचा….!!
सावंतवाडी बाजारपेठेत तर काही भाजीपाला विक्रेते पुरुष, महिला सुद्धा शेकड्यात नव्हे तर रोजच्या रोज हजारात मटका खेळतात. दिवसभर कमावलेला पैसा मटक्याचा नादात घालवतात, कधीतरी हजारो रुपये मिळवतात आणि त्याच आशेने पुन्हा पुन्हा मटका लावतात. असेही नमुने आहेत जे मटक्याच्या वेळेत चार पाच किलोमीटर लांबून सावंतवाडी बाजारात फक्त आकडा काय आला हे पाहण्यासाठी, आणि नवीन आकडा लावण्यासाठी येतात. त्यांचा जणू काय तो व्यवसायच. शाळा, कॉलेजची कित्येक मुले आणि काही तर त्या मुलांना शिकवणारे महाभाग सुद्धा स्वतः न येता दुसऱ्यांकडे आकडा आणि पैसे देऊन मटका लावतातच. कितीतरी सुशिक्षित लोक, रिटायर्ड लोक सुद्धा मटका खेळतात, काही मटक्यावाल्यांचे फोन नंबर घेऊन डायरेक्ट फोनवरच कॉन्टॅक्ट करून नंबर लावतात. अशा एक ना अनेक मार्गांनी दिवसाकाठी सावंतवाडीत लाखो रुपयांचा मटका लावला जातो, ज्यात मटका कंपनीवाल्या मालकाला किमान 50 हजार रुपये मिळतात, भले त्यात लोकांना कितीही मिळो.
सावंतवाडीत काही वर्षे चार ते पाच मटका कंपन्या चालू आहेत. एखाद्याने बंद केलेली कंपनी दुसरा चालवतो अशाप्रकारे चैन सुरूच आहे. त्यामुळे दुसरा कोणताही व्यवसाय न करता गडगंज पैसा मिळतो, आणि पैशांच्या हफ्ता असल्याने खाकीची सुद्धा मेहेरनजर असते, त्यामुळे अलीकडे या शुभ्र व्यवसायाकडे शुभ्र कपडे घालणारे नेते, लोकप्रतिनिधी सुद्धा वळू लागले आहेत.
कित्येकवर्षे मिशिवर ताव मारत मटक्याच्या धंद्यात प्रकाश पाडणाऱ्यांसोबतच आड वाटेने धीर धरत दोघे भाऊ सुद्धा नेटाने उतरले आणि त्यांनी कमावलेली संपत्ती पाहून त्यांच्या सोबतचे काही लोकप्रतिनिधी मटक्याच्या रणांगणात उतरले. त्यांनी आपली स्वतःची भागीदारीत मटका कंपनी सुरू केली. कोणी वक्ते, कोणी प्रवक्ते तर कोणी बाहेरच्या भागातून आलेले भागीदारीत नामानिराळे राहत मटक्याच्या धंद्यात प्रवेशकर्ते झाले. कुठलाही व्यवसाय असो, नैतिक वा अनैतिक, त्यात स्पर्धा ही असतेच. स्पर्धेच्या युगात नविन कंपनीला बाजारात पाय रोवायला मार्केट मिळेना, शेवटी माल खपवायचा तर त्यासाठी दुकानदार लागतोच. स्वतः रस्त्यावर बसून विकायला तो भाजीपाला नव्हे, आणि पांढऱ्या कपड्यात स्वतः विकूही शकत नाही.
माका नाय तुला घाल कुत्र्याक अशी अवस्था झाल्याने आपल्या कंपनीला मार्केटमध्ये स्थान मिळत नाही म्हटल्यावर काहींनी मटका धंद्यांच्या नावाने बोंबाबोंब सुरू केली, आणि राजकीय दबावापोटी खाकीच्या शिलेदारांनी काही मटका स्वीकारणाऱ्या दुकाने, टपरीवर धाड टाकत, चार/पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यास सुरुवात केली. शेवटी आपण किती कर्तव्यदक्ष आहोत याचाही पुरावा द्यावाच लागतो म्हणा. या टपरीवर कारवाई करून मटका बंद होईल का? टपरिवाल्यांचं झालेलं नुकसान कंपनी देतंच असते आणि अगदी जामीन देऊन सोडवूनही आणते मग ही नाटकं करायची कशाला तर ओरड मारणाऱ्यांना केलेली कारवाई दाखविण्यासाठी?
खरोखरच मटका बंद करायचा असेल तर खाकी वर्दीवाल्यांनी धोकादायक झाडाच्या फांद्या मारून धोका टाळण्यापेक्षा झाडाला मुळासहित तोडलं पाहिजे. तरच त्याला नवीन फुटवे येऊन झाड बहरणार नाही. अन्यथा तोडलेल्या फांद्या वाढल्या की पुन्हा धोका उत्पन्न होतोच. त्याचप्रमाणे मटक्याच्या दुकान, टपरीवर कारवाई करत लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून आपला हफ्ता वाढविण्यापेक्षा निःपक्षपाती कारवाई करून जनतेची शाबासकी घ्यावी.

क्रमशः

पुढे वाचा मटकावाल्यांनी काय काय ऐश्वर्य उभारलं….

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 11 =