दरवर्षी गणेश चतुर्थी सणामध्ये सुरू होणार अशी वार्ता येते….

दरवर्षी गणेश चतुर्थी सणामध्ये सुरू होणार अशी वार्ता येते….

ती चिपी विमानतळ सुरू होण्याबाबत आठ दिवसात रिझल्ट.

विशेष संपादकीय….

गेली तीन वर्षे गणेश चतुर्थी आली की विमानतळ हा विषय उकरून काढण्यात येतो. दीपक केसरकर पालकमंत्री असताना तर एकदा श्री गजानन विमानाने चिपी विमानतळावर उतरले देखील परंतु तरीही आजतागायत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात भर घालणारं चिपी विमानतळ सुरू झालेले नाही.
कोंकण रेल्वेचे शिल्पकार मधू दंडवते यांच्यामुळे कोकण विकासाची गंगा म्हणून कोंकण रेल्वे जिल्ह्यात आली. परंतु त्यानंतर कित्येक दिग्गज मंत्री झाले अगदी केंद्रात रेल्वेमंत्री पद देखील कोकणाकडे चालून आले, परंतु एकही कोकण विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोकणात आला नाही. पैसे टाकून मते मिळविणे आणि सवंग लोकप्रियतेसाठी मोठमोठ्या बाता मारणे या व्यतिरिक्त जिल्ह्यातील नेत्यांकडून कोकणचा, जिल्ह्याचा कसलाही विकास झाला नाही.


एकीकडे नारायण राणे भाजपवासी होऊन केंद्रात मंत्री झाले, त्यांनी चिपी विमानतळ लवकरच सुरू करणार अशी घोषणा केली त्याबरोबर जिल्ह्यातील शिवसेनेच्या लोकनियुक्त खासदारांना जाग आली. नारायण राणे श्रेय घेतील त्या अगोदर आपण त्यापुढील घोषणा करत खासदार आणि शिवसेना लोकसभा गटनेते विनायक राऊत यांनी आठ दिवसात रिझल्ट देतो असे नूतन केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितल्याची माहिती दिली. म्हणजे झालं सुरू तर आपला प्रयत्न आणि न झाल्यास ज्योतिरादित्य सिंधिया यांचं अपयश असं म्हणायला बरं. सवंग लोकप्रियतेसाठी काहीशी अशीच परिस्थिती आजकाल सेनेच्या नेत्यांची झालेली आहे.
शिवसेनेचे जिल्हापरिषदेतील गटनेते नागेंद्र परब यांनी ही माहिती देताना पुढे असेही म्हणाले की शुक्रवारी ९ जुलै २०२१ रोजी खासदार विनायक राऊत यांनी विमानतळाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतल्यावर असे दिसून आले की, विमानतळ सुरू करण्यास आवश्यक सर्व कामे पूर्ण झाली असून कोणत्याही त्रुटी राहिलेल्या नाहीत. तसेच २८ जून २०२१ रोजी आयआरबी कंपनीने नागरी हवाई वाहतूक संचनालयाला त्या संदर्भातील ऍक्शन टेकन रिपोर्ट सबमिट करून 4C VFR एरोड्रोम लायसन्स मिळणेसाठी विनंती केलेली आहे. त्यामुळे विमानतळाचे काम संपूर्ण पणे पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी १३ जुलै २०२१ रोजी दिल्ली येथे नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेत चिपी विमानतळाची नागरी हवाई वाहतूक संचलनालयची (DGCA) पाहणी होऊन लवकरात लवकर चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळावी अशी विनंती केली. यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी आपण याबाबत विशेष लक्ष घालून आठ ते दहा दिवसांत रिझल्ट देतो असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे चिपी विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होऊल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा विकासात्मक दृष्ट्या खूपच मागे पडत चालला आहे. आमदार खासदार मंत्री होतात, नेत्यांचा विकास होतो परंतु जिल्ह्याचा विकास हा वर्षानुवर्षे शोधावा लागतो. वडिलांनी मंजूर केलेले विमानतळ त्यांचा मुलगा मंत्री झाल्यावर सुरू करण्याचे आश्वासन मिळते म्हणजे विकासाची गती काय? असा प्रश्न देखील जिल्हावासियांना पडला आहे. पूर्वी सुद्धा मोठमोठे देशपातळीवरील मंत्री जिल्ह्यातून होऊन गेले, त्यांचा स्वतःचा विकास झालेला दिसला नाही परंतु कोकण रेल्वेसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोठ्या जिकरीने आणला आणि आज त्यामुळेच जिल्ह्यातील जनता आठ तासात मुंबईत पोचते, देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे प्रवास करत जाते आहे. सी वर्ल्ड ची घोषणा झाली परंतु आजपर्यंत सी वर्ल्ड प्रकल्प सुरू झाला नाही परंतु विनाशकारी असलेला नाणार सारखा औष्णिक प्रकल्प जिल्ह्याच्या माथी मारण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू आहे. एकीकडे पर्यटन जिल्हा म्हणून नावाजायचे आणि दुसरीकडे प्रदूषणकारी प्रकल्प आणायचे अशी दुपट्टी भूमिका नेत्यांकडून सुरू आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी तरी जिल्ह्यातील नेत्यांनी एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा एक होऊन जिल्ह्याच्या खरोखरच फायद्याचे असलेले प्रकल्प जिल्ह्यात आणावेत अशीच जिल्हावासीयांची प्रांजळ इच्छा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा