You are currently viewing ग्राम विलगीकरण केंद्रामध्ये कक्ष व्यवस्थापन ड्युटीसाठी शिक्षकांच्या नेमणुका करू नयेत

ग्राम विलगीकरण केंद्रामध्ये कक्ष व्यवस्थापन ड्युटीसाठी शिक्षकांच्या नेमणुका करू नयेत

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गची मागणी

कोविड -१९ साठीच्या अनुषंगाने संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये व्यवस्थापक म्हणून शिक्षकांना नियुक्त करण्याचे आदेश जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेले आहे .सध्या प्राथमिक शिक्षक हे २२ एप्रिल ते आजपर्यंत चेक पोस्ट , रेल्वे स्टेशन , प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती तसेच माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण इ.ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत . सदरची सेवा बजावत असताना कोरोनाच्या संसर्गाने जिल्ह्यातील ३ शिक्षकांचा मृत्यू झाला असून अनेक शिक्षक व त्यांचे कुटुंब सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने बाधित झालेले आहेत .
आता ग्रामविलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात येणारे नागरिक हे कोविड बाधित असल्याने त्याचा प्रादुर्भाव शिक्षकांना होऊ शकतो त्यामुळे शिक्षकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे व पर्यायाने अनेक शिक्षक,त्यांचे कुटुंब बाधित होऊ शकतात.तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ असून अति दुर्गम भागात वाडी वस्त्यावर शाळा आहेत.सिधुदुर्ग जिल्ह्यात भरपूर पाऊस पडतो . पावसाळ्याच्या दिवसात विलगीकरण कक्षाबाहेर राहून ड्युटी करणे हे शिक्षकांच्या जीवितास धोकादायक ठरू शकते.तसेच नैसर्गिक अडचणींना विशेषतः महिला शिक्षकांना सामोरे जावे लागते . तसेच नवीन शैक्षणिक सत्र हे १४ जून पासून सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी व शालेय इतर कामकाजासाठी शिक्षकांना या ड्युटीतून कार्यमुक्त करावे ग्रामविलगीकरण कक्ष व्यवस्थापन ड्युटीवर शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येऊ नये,अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने आग्रही मागणी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग ,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा