You are currently viewing नवीन कोरोना व्हायरसची शिकार तरुणवर्ग का होतोय?

नवीन कोरोना व्हायरसची शिकार तरुणवर्ग का होतोय?

तरुणांची शिकार चिंतेचा विषय

संपादकीय….

कोरोनाच्या विळख्यात आतापर्यंत वयस्कर आणि आजार असलेल्या व्यक्तीच येत होत्या. त्यामुळे तरुण जरी कोरोनाच्या तावडीत सापडला तरी काहीवेळा औषधोपचार न करताही बरा होत होता. तरुणांना कोरोनामुळे जीवितास धोका वाटत नव्हता. कोरोनाच्या तडाख्यात त्यावेळी वृद्ध किंवा आजार असलेल्या व्यक्तीच यायच्या, परंतु मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते.
नवीन कोरोना व्हायरस मात्र वेगाने फैलावत असून लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांवरच आपली पकड मजबूत करतो. एकाच दिवसात एकापासून अनेकांना संसर्ग होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. नवीन कोरोना व्हायरस वृद्ध,आजारी व्यक्तींवर तर जोरदार प्रहार करतोच आणि काळजी न घेतल्यास त्यात त्यांच्या जीवितास देखील धोका पोचवतो, परंतु यावेळी तरुण वर्ग देखील कोरोनाच्या तावडीतून सुटलेला नाही. अवघ्या वीस ते पन्नास वयाच्या व्यक्तींवर देखील कोरोनाने जोरदार प्रहार केलेला दिसून येत असून अनेक युवकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला पहावयास मिळत आहे.
तरुण वर्ग देखील कोरोनाचा शिकार का होतोय याचं नेमकं कारण मात्र शोधून सापडत नाही. अनेक तरुण युवावर्ग मागच्या कोरोनाच्या लाटेत तरुणांना कोरोनामुळे नुकसान पोहचत नव्हते त्याच दुनियेत अजूनही वावरत असून आपल्याला कोरोनामुळे काहीही होणार नाही या भ्रमात राहतो. परिणामी कोरोनाचा संसर्ग छातीत, फुफ्फुसाला होऊन प्रतिकारशक्ती कमी असलेला तरुण मात्र गोत्यात येतो. फुफ्फुसाला होणारा संसर्ग हा योग्यवेळी उपचार न केल्यास बळावत जातो आणि त्यातून युवावर्ग मृत्युमुखी पडण्याच्या घटना जास्त घडताना दिसत आहेत. पूर्वीचा तरुण हा मैदानी खेळ, व्यायाम, आणि परिश्रम करणारा होता. आताच्या डिजिटल युगात मोबाईल आणि कॉम्प्युटर मित्र बनवलेला युवावर्ग शारीरिक दृष्ट्या कमजोर असतो आणि कोरोना सारखे संकट आल्यावर त्याचा त्रास जाणवू लागला की मानसिकदृष्ट्या खचून जातो. मानसिकदृष्ट्या खचलेल्या युवकांवर अशावेळी कोरोना आघात करतो. त्यामुळे कोरोनाचा शिकार झालेल्या रुग्णाने मानसिकदृष्ट्या कणखर असले पाहिजे. आजकाल बराचसा युवावर्ग हा व्यसनाधीन झालेला आहे, व्यसनांच्या पायी अंगाने भरीव भक्कम दिसला तरी आतून पोखरलेला आहे. असे व्यसनांच्या पायी वाया गेलेले युवक मात्र कोरोनाच्या विळख्यात सापडले तर त्यातून बाहेर पडणे त्यांना मुश्किल होऊन जातं. अशावेळी प्राथमिक अवस्थेतच योग्य काळजी घेतली तरंच युवा असो वा वृद्ध त्यांना कोरोनावर विजय मिळवता येतो.
जो डर गया वो मर गया या उक्तीप्रमाणे आजकाल युवावर्ग कोरोनाचा शिकार होताना दिसत आहे. कोरोना संसर्ग झाल्यावर युवा असला तरी रुग्णाने काळजी घेतली पाहिजे. योग्य औषधोपचार अथवा टेस्ट करून नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी रुग्णालयात दाखल झाले पाहिजे. रुग्णालयात जाण्यास घाबरतात किंवा उशीर करतात तेच तरुण आजकाल जास्त गोत्यात आलेले पहायला मिळत आहेत. कोरोना झाला म्हणजे आपल्याला जिल्हा रुग्णालयात नेऊन टाकतील, तिथे आपले काय होईल अशी भीती अनेकांच्या मनात असते त्यामुळे युवावर्ग उपचारासाठी बाहेर पडत नाही आणि कोरोना डाव साधतो.
त्यामुळेच नवीन कोरोनाच्या लाटेत युवावर्ग सर्वात जास्त शिकार होताना दिसत आहे.
युवावर्गावर होणारा कोरोनाचा आघात कमी करायचा असेल तर आरोग्य विभागाने, आरोग्यसेवकांच्या माध्यमातून शहरात, गावागावात लोकांमध्ये जागृती केली पाहिजे, युवावर्गाच्या मनातील भीती काढून टाकली पाहिजे. तरच नवयुवक कोरोनाच्या तावडीतून सहीसलामत बाहेर पडतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 11 =