मंत्री ॲड. आशिष शेलार यांचा दुर्गम भागातील मोबाईल नेटवर्क समस्यांवर भर
रत्नागिरी-सिंधुदुर्गासाठी नव्याने सर्वेक्षण; “कनेक्टिव्हिटी दरबार” उपक्रम राबविणार
सिंधुदुर्ग :
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील दुर्गम व डोंगराळ भागांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याच्या समस्येबाबत मंत्री Ashish Shelar यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले.
दुर्गम भागांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी, भारत संचार निगमचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त सहभागातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे ठोस कृती आराखडा तयार करून नेटवर्कविहीन गावांना प्राधान्याने जोडण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
याशिवाय प्रत्येक तालुक्यात “कनेक्टिव्हिटी दरबार” आयोजित करण्याची संकल्पना बैठकीत मांडण्यात आली. या उपक्रमात भारत संचार निगमचे अधिकारी, स्थानिक आमदार, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि नागरिक प्रत्यक्ष सहभागी होऊन नेटवर्क समस्यांची नोंद करतील व त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
तसेच कोणती गावे सॅच्युरेशन प्रकल्पात समाविष्ट करावीत, कोणत्या ठिकाणी नवीन मोबाईल टॉवर उभारण्याची आवश्यकता आहे आणि ही कामे किती कालावधीत पूर्ण होणार याचा तालुकानिहाय सविस्तर रोडमॅप तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या बैठकीस Shekhar Nikam, महाआयटीच्या संचालक भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, विभागाचे अवर सचिव योगेश गोसावी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे भाजपा पदाधिकारी अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नांदोसचे सरपंच विजय निकम, निवासी जिल्हाधिकारी आणि भारत संचार निगमचे अधिकारी अमित पाटील उपस्थित होते.
