अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली
शिरगाव-शिरवली एसटी बसफेरी सुरू; ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण
देवगड
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली शिरगाव-शिरवली एसटी बसफेरी अखेर १९ मेपासून सुरू झाली असून पालकमंत्री यांच्या सहकार्यामुळे ही सुविधा उपलब्ध झाल्याने शिरगाव व शिरवली परिसरातील ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.
देवगड तालुक्यातील शिरगाव हे पंचक्रोशीतील महत्त्वाचे बाजारपेठेचे केंद्र असून परिसरातील ग्रामस्थ विविध शासकीय कामे, वैद्यकीय सेवा, बाजारहाट, बँक व्यवहार तसेच शिक्षणासाठी येथे ये-जा करतात. शिरवली हे गाव शिरगावच्या जवळ असले तरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने ग्रामस्थांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.
कणकवली आगाराची कणकवली-सांडवे मार्गे शिरगाव ही बसफेरी यापूर्वी ओंबळ काझरवाडीपर्यंत सुरू होती. मात्र शिरवली गाव तेथून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असल्याने ग्रामस्थांना एसटीसाठी पायपीट करावी लागत होती. त्यामुळे अनेकांना खासगी वाहनांचा खर्चही सहन करावा लागत होता.
१ मे रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिरगाव दौऱ्यावेळी ग्रामस्थ, व्यापारी तसेच शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. अखेर मंगळवारपासून ही बसफेरी शिरवलीपर्यंत विस्तारित करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या मागणीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विस्तारित बसफेरीचा शुभारंभ शिरवलीच्या सरपंच सुचिता मोहिते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य मिलिंद साटम, मंगेश लोके, शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक गणपत तावडे, शाळा समिती सदस्य दिनेश साटम, पोलिस पाटील बिंदुसार नांदगावकर, ग्रामपंचायत सदस्य दिनेश पोयरेकर, अनिल नवले, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद कदम, डॉ. संदीप कदम, बबलू कदम, कणकवली आगाराचे वाहक प्रशांत परब, चालक अजित राणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
